नवी दिल्ली – अमेरिका आणि दक्षिण कोरियाने जर चिथावणी दिली तर या देशांचा नायनाट करण्याचे आदेश उत्तर कोरियाचे सर्वेसर्वा किम जोंग उन यांनी दिले आहेत. दक्षिण कोरियाच्या सरकारी माध्यमांनी याबाबतचे वृत्त प्रसिद्ध केले आहे. अमेरिकेच्या कथित चिथावणीला उत्तर देण्याचा आपला निर्धार किम यांनी पुन्हा एकदा बोलून दाखवला आहे.
अमेरिकेतील निवडणुका नोव्हेंबर महिन्यात होणार आहेत. त्याचवेळी उत्तर कोरियाचे लष्करी सामर्थ्य आणि घातक शस्त्रांच्या चाचण्या वाढवण्यात येतील , असे किम यांनी म्हटले आहे. जर अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पुन्हा निवडून आले तर आपल्या वाढील अण्वस्त्रांच्या साठ्यांमुळे सवलती मिळू शकण्याची किम यांना आशा असावी, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
आणखीन ३ टेहळणी उपग्रहांचे प्रक्षेपण करण्यात येईल. अधिक अण्वस्त्रांचे उत्पादन केले जाईल आणि या वर्षभरात आक्रमक ड्रोनही विकसित केली जातील, असे किम यांनी अलिकडेच सत्तारुढ पक्षाच्या पाच दिवसांच्या बैठकीदरम्यान म्हटले होते. अमेरिकेशी भविष्यात कराव्या लागणाऱ्या वाटाघाटींसाठी दबावतंत्र वापरण्याचा किम यांचा हा प्रयत्न असावा, असे तज्ज्ञांचे मत आहे.
अमेरिका आणि दक्षिण कोरिया सातत्याने उत्तर कोरियाला चिथावणी देत असल्यामुळे त्यांच्यासह अन्य देशांना धडा शिकवला जाईल, असेही किम जोंग उन म्हणाले होते.
उत्तर कोरियाच्या या संभाव्य हालचालींना उत्तर देण्यासाठी दक्षिण कोरियानेही आपल्या लष्करी सामर्थ्याला वाढवण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. नववर्षानिमित्त दक्षिण कोरियाचे अध्यक्ष यून सूक येओल यांनी याबाबतचे सूतोवाच केले आहे.