पॅरिस, – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी पॅरिसमधील एलिसी पॅलेस येथे फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉ यांच्याबरोबर खाजगी आणि शिष्टमंडळ स्तरीय चर्चा केली. उभय नेत्यांनी संरक्षण व सुरक्षा, नागरी आण्विक, विज्ञान – तंत्रज्ञान, ऊर्जा, व्यापार व गुंतवणूक, अंतराळ, हवामान आणि लोकांचे परस्परांशी थेट संबंध यासह द्विपक्षीय सहकार्याच्या विस्तृत क्षेत्रांवर तपशीलवार चर्चा केली.
भारताचे जी-20 अध्यक्षपद, हिंद-प्रशांत क्षेत्र व परस्पर हितसंबंधांच्या प्रादेशिक तसेच, जागतिक मुद्द्यांवरही चर्चा झाली. भारत आणि फ्रान्स यांच्या भविष्यवेधी धोरणात्मक भागीदाराचा पट मांडणाऱ्या हॉरीझॉन 2047: चार्टिंग द फ्युचर ऑफ इंडिया-फ्रान्स स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप हा महत्त्वाकांक्षी परिणामकारक दस्तऐवजही स्वीकारण्यात आला. यावर्षी सप्टेंबरमध्ये होणाऱ्या जी-20 नेत्यांच्या शिखर परिषदेसाठी अध्यक्ष मॅक्रॉ यांचे नवी दिल्लीत स्वागत करण्यास उत्सुक असल्याचे पंतप्रधानांनी यावेळी सांगितले.
मोदी यांनी फ्रेंच नॅशनल असेंब्लीच्या अध्यक्ष येल ब्राऊन पिवेट आणि असेंब्लीच्या वरिष्ठ नेत्यांची भेट घेतली. अध्यक्षांच्या अधिकृत निवासस्थानी दुपारच्या भोजनाच्या वेळी ही भेट झाली. उभय नेत्यांनी लोकशाही, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता ही सामायिक मूल्ये अधोरेखित केली. त्यांनी दोन्ही देशांच्या संसदेमधील सहकार्य अधिक वृद्धिंगत करण्याच्या उपायांवर चर्चा केली. फ्रेंच संसदेच्या अध्यक्षांनी भारताच्या व्यापक निवडणूक प्रक्रियेचे कौतुक केले.
व्यापार आणि अर्थव्यवस्था, पर्यावरण, तंत्रज्ञान आणि संस्कृती यासह धोरणात्मक सहकार्याच्या विविध स्तंभांवरही यावेळी चर्चा करण्यात आली. उभय नेत्यांनी प्रादेशिक आणि जागतिक मुद्यांवरही मते व्यक्त केली.पॅरिसमध्ये प्रसिद्ध फ्रेंच योग शिक्षिका शार्लोट चोपिन यांची भेट घेतली. पंतप्रधानांनी चोपिन यांच्या योगावरील गाढ विश्वास आणि फ्रान्समध्ये योगाच्या प्रचारात त्यांनी दिलेल्या महत्त्वपूर्ण योगदानाचे कौतुक केले.
पॅरिसमधील उद्योजकांसमोर पंतप्रधानांचे भाषण
पंतप्रधान नरेंद्र मोदी व मॅक्रॉ यांनी पॅरिसमधील क्वाई डी’ओर्से येथे प्रमुख भारतीय तसेच फ्रेंच मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या गटाला संयुक्तपणे संबोधित केले. या गटामध्ये विमान वाहतूक, उत्पादन, संरक्षण, तंत्रज्ञान, ऊर्जा यासह विविध क्षेत्रातील मुख्य कार्यकारी अधिकारी यांचा समावेश होता. द्विपक्षीय संबंध मजबूत करण्यासाठी तसेच भारत व फ्रान्समधील आर्थिक सहकार्याला चालना देण्यासाठी या उद्योग नेत्यांनी बजावलेल्या भूमिकेबद्दल पंतप्रधानांनी त्यांची प्रशंसा केली.
नवीकरणीय ऊर्जा, स्टार्टअप्स, फार्मा, आयटी, डिजिटल पेमेंट, सोबतच पायाभूत सुविधांमध्ये भारताची प्रगती आणि व्यवसायाला चालना देण्यासाठी हाती घेतलेल्या विविध उपक्रमांवर यावेळी त्यांनी प्रकाश टाकला. पंतप्रधानांनी या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना भारतातील गुंतवणुकीच्या संधींचा फायदा करून घेण्यासाठी आणि भारताच्या विकास कार्याचा एक भाग होण्यासाठी प्रोत्साहित केले.