नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सोमवारी 27 एप्रिलला सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधणार आहेत. कोरोनाच्या या संकटकाळात गेल्या महिनाभरात ही अशा पद्धतीची तिसरी बैठक पंतप्रधान सर्व मुख्यमंत्र्यांसोबत करत आहेत.
सध्या देशातल्या लॉकडाऊनची मुदत 3 मेपर्यंत वाढवण्यात आली आहे. त्यानंतर देशातल्या लॉक डाऊनची रणनीती काय असावी याची चर्चा या बैठकीत होणार आहे.लॉकडाऊनच्या पहिल्या टप्प्यातही पंतप्रधान मोदींनी सर्व मुख्यमंत्र्यांचा कल जाणून घेतला होता.
14 एप्रिलला लॉकडाऊनच्या पहिल्या टप्प्याची मुदत संपत होती. त्याआधी 10 एप्रिलला पंतप्रधानांनी सर्व मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला होता. या बैठकीत बहुतांश राज्यांनी लॉकडाऊन वाढवण्याची गरज असल्याचे बोलून दाखवले होते. त्यानंतरच देशपातळीवर ही मुदत 3 मेपर्यंत वाढवण्यात आली होती. आता सोमवारी होणाऱ्या बैठकीतही राज्यांचे लॉकडाऊन वाढवण्याबाबत काय मत आहे, याचा अंदाज घेतला जाणार आहे.