नवी दिल्ली : देशात सध्या भारत आणि इंडिया नावावर नवा वाद निर्माण आहे. केंद्र सरकारकडून इंडिया नावात बदल करण्यात येत असून त्याऐवजी भारत हे नाव देण्याचा मोदी सरकारचा मानस असल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात येत आहे. त्यासाठी काँग्रेसने G-२० परिषदेच्या निमंत्रण पत्रिकेचा फोटो शेअर करत आरोप केले आहेत. निमंत्रण पत्रिका समोर आल्यानंतर आता सरकारी पुस्तिकेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा Prime Minister of Bharat असा उल्लेख करण्यात आला आहे.
इंडोनेशियामध्ये आयोजित ASEAN-India परिषदेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज रावण होणार आहेत. ASEAN-India सागरी सुरक्षा सहकार्याला चालना देण्यासाठी नवीन उपक्रमाचे अनावरण करण्यात येणार आहे. ASEAN (दक्षिण पूर्व आशियाई राष्ट्रांची संघटना) चं अध्यक्षपद इंडोनेशियाकडे आहे. त्यामुळे इंडोनेशियामध्ये या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
‘The Prime Minister Of Bharat’ pic.twitter.com/lHozUHSoC4
— Sambit Patra (@sambitswaraj) September 5, 2023
दरम्यान, पंतप्रधानांच्या इंडोनेशिया दौऱ्यावरील सरकारी पुस्तिकेत नरेंद्र मोदींचा उल्लेख “प्राईम मिनिस्टर ऑफ भारत” (भारताचे पंतप्रधान) असा करण्यात आला आहे. मंगळवारी रात्री भाजपचे प्रवक्ते संबित पात्रा यांनी ट्वीटद्वारे याची माहिती दिली.
केंद्र सरकारने संसदेचे पाच दिवसांचे विशेष अधिवेशन बोलावले असले तरी, त्यातील प्रमुख विषय अजूनही गोपनीय ठेवण्यात आले आहेत. त्यातच, राष्ट्रपतींच्या राजपत्रामधून ‘इंडिया’ हा शब्द गायब होऊन ‘भारत’ असा उल्लेख करण्यात आल्याने तर्कवितर्क लढविले जाऊ लागले आहेत.
संसदेच्या विशेष अधिवेशनामध्ये संविधानदुरुस्तीद्वारे ‘इंडिया’ हा शब्दप्रयोग वगळून देशाचा नामोल्लेख केवळ ‘भारत’ असा केला जाणार असल्याची शक्यताही वर्तवली जात आहे. मात्र, याबाबत केंद्र सरकारकडून अधिकृतपणे कोणतेही स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही.