मुंबई – गोविंदगिरी महाराज यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना थेट छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी केल्यामुळे एका नव्या वादाला तोंड फुटले आहे. या प्रकरणी शिवसेना (ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह अनेकांनी त्यांच्यावर टीका केली होती. पण गोविंदगिरी महाराज आपल्या विधानावर ठाम आहेत. उलट त्यांनी मोदी शिवरायांचे अनुसरण करत असतील तर त्यांचे गुणगान करण्यात संकोच का? असा सवाल केला आहे.
अयोध्येतील श्री राम मंदिरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नुकतीच रामलल्लांची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. समर्थ रामदास स्वामी यांनी महाराजांचा उल्लेख निश्चयाचा महामेरू म्हणून केला होता. आज आपल्याला मोदींच्या रुपात असाच श्रीमंत योगी मिळाला आहे. जगदंबा मातेने त्यांना हिमालयातून भारत मातेच्या सेवेसाठी पाठवले आहे, असे गोविंद देवगिरी महाराज या प्रकरणी म्हणाले होते.
गोविंदगिरी महाराज पुढे म्हणाले की, मी छत्रपती शिवाजी महाराज यांची तुलना कुणाशीही करणार नाही. प्रभू श्री राम व श्री कृष्णानंतर मला छत्रपती शिवाजी महाराज सर्वश्रेष्ठ वाटतात. त्यांच्या गुणांचे अनुसरण काहीजण करतात. त्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा समावेश आहे. हे सांगण्यात मला कोणताही संकोच वाटत नाही. एखाद्या चुकीच्या गोष्टीवर आपण टीका करतो. त्याप्रमाणे सदगुणांचा गौरव करण्यात कोणताही संकोच वाटत नाही. कोती मने असणाऱ्यांच्या व मनात कायम राजकारण असणाऱ्यांच्या तोंडात अशा प्रकारच्या गोष्टी येतात, असे गोविंदगिरी महाराज आपल्यावर टीका करणाऱ्यांना उद्देशून म्हणाले.