देऊळगाव राजे (वार्ताहर) – करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे सर्वच उद्योगधंदे आणि शेती मालाची वाट लागली आहे. त्यामुळे ग्रामीण भागातसुद्धा मजूर वर्गांना काम धंदा राहिला नाही. त्यातच सिमेंट, स्टील, वाळू, क्रशखडी, वीट यांचे बाजारभाव वाढल्यामुळे ग्रामीण भागातील बांधकामांनाही दरवाढीची खीळ बसली आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील बांधकामे बंद पडली आहेत. सिमेंटच्या प्रत्येक गोणीमागे शंभर ते दीडशे रुपयांनी वाढ झाली असल्याने ही वाढ बांधकाम खर्चात जोडली जात आहे.
घर बांधकामसाठी लागणारे इतर साहित्याच्या दरामध्येही मोठी वाढ झाली आहे. त्याप्रमाणे घरासाठी स्टील आणि लोखंड या साहित्याच्या किंमतीतही प्रति मेट्रिक टनामागे दोन ते तीन हजार रुपयांप्रमाणे वाढ झाली आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील घराची कामे बंद पडली आहेत. सुरवातीला सुरू असलेली बांधकामे साहित्याचे दर हाताबाहेर गेल्यामुळे सद्यस्थितीत ठेवली आहेत. बांधकामासाठी प्रमुख म्हणून सिमेंट, लोखंड यांच्या किमती वाढल्याने घर बांधकाम करणे अवघड झाले आहे. सध्या सिमेंटचे दर प्रति गोणी 365 ते 380 रुपये आहेत. स्टीलचे दर 43 ते 50 हजार रुपये प्रतिटन आहेत. वाळू सहा ते साडेसहा हजार रुपये प्रती ब्रास आहे.
बांधकाम साहित्याचे दर आवाक्याबाहेर गेल्याने नागरिकांनी घर, इतर बांधकामे जैसे थे, ठेवली आहेत. त्यामुळे मजुरांचे जगणे अवघड झाले आहे.
– दत्ता सुतार, गवंडी