डॉ. राजू गुरव
पुणे – करोनाचा लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर राज्यातील शाळा टप्प्याटप्प्याने सुरू करण्याबाबत शालेय शिक्षण विभागाने सोमवारी मार्गदर्शक सूचना जारी केल्या. यात शाळा व्यवस्थापन समिती, पालक, शिक्षक यांची जबाबदारीही निश्चित करुन देण्यात आली आहे.
मार्गदर्शक सूचना जारी :
शाळा टप्प्याटप्प्याने सुरू होणार
निर्णयाचे अधिकार स्थानिक पातळीवर प्रत्यक्ष शाळा सुरू करण्याविषयी स्थानिक पातळीवर प्रशासन, ग्रामपंचायत व शाळा व्यवस्थापन समितीने एकत्रित निर्णय घ्यावा लागणार आहे. शाळा व्यवस्थापन समितीच्या मुख्य शिफारशी व तज्ज्ञ व्यक्तीच्या शिफारशीनुसार कंटेन्मेंट झोनमधील शाळा सुरू करण्याबाबत जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्तांनी निर्णय घ्यावा. शाळांनी शाळा व्यवस्थापन समितीच्या बैठका घेऊन शाळा सुरू करण्यापूर्वी करावयाची तयारी-नियोजन याबाबत निर्णय घ्यावा, असे सूचित करण्यात आले आहे.
शाळांसाठी नियमावली
* दोन सत्रांत किंवा वर्गनिहाय दिवसाआड शाळा भरवावी
* एक सत्र तीन तासांपेक्षा जास्त कालावधीचे असू नयेत
* एका वर्गात 20 ते 30 विद्यार्थ्यांची बसण्याची व्यवस्था करावी
* एका वर्गात एका बेंचवर एकच विद्यार्थी बसवावा
* वर्गखोल्या सतत स्वच्छ ठेवाव्यात
* हात धुण्यासाठी साबण, पाणी उपलब्ध करुन द्यावे
* बसेस व ऑटोमध्ये विद्यार्थ्यांची गर्दी होऊ नये
* शालेय पोषण आहाराअंतर्गत विद्यार्थ्यांना घरपोच धान्य वाटप करावे
* शाळेत शिक्षक, विद्यार्थी यांच्या व्यतिरिक्त कोणालाही प्रवेश देऊ नयेत
* मोफत पाठ्यपुस्तकांच्या वाटपाचे नियोजन करावे
* विद्यार्थी, पालकांना मास्क वापरणे, सुरक्षित अंतर ठेवण्याबाबत माहिती देणे
* स्थलांतरित मजुरांच्या मुलांना प्रवेश, पाठ्यपुस्तके व इतर सुविधा उपलब्ध कराव्यात
दक्षता घ्यावीच लागणार
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेमार्फत शैक्षणिक वर्ष 2020-21 चे शैक्षणिक कॅलेंडर व अभ्यासक्रम यांचा आराखडा सर्व शाळांना उपलब्ध करुन देणे आवश्यक ठरणार आहेत. शालेय शिक्षण विभागाचे उपसचिव राजेंद्र पवार यांनी मार्गदर्शक सूचनांबाबतचे आदेश जारी केले आहेत. आवश्यकतेनुसार प्रवेश प्रक्रिया ही ऑनलाइन पद्धतीने किंवा शाळेमध्ये गर्दी होणार नाही, याची दक्षता घेऊनच करावी लागणार आहे.
शिक्षकांची जबाबदारी
* शाळा सुरू होण्यापूर्वी शिक्षकांनी कार्यक्षेत्रात उपस्थित रहावे
* शाळेवर नियुक्त असलेल्या गावातच राहण्याची व्यवस्था करावी
* अभ्यासक्रमाबाबत विद्यार्थ्यांच्या शंकाचे निराकरण करावे
* विद्यार्थ्यांच्या शिक्षकांसाठी पालकांनाही मार्गदर्शन करावे
* ऑनलाइन अध्ययनासाठी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावे
* विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, याची दक्षता बाळगावी
पालकांची जबाबदारी
* मुलांना घरातून मास्क घालून पाठविणे
* पाण्याच्या बाटल्या, हात रुमाल, छोट्या चटई मुलांना देणे
* तोंडाला स्पर्श न करण्याची सवय मुलांना लावणे
* हात साबणाने धुण्याची सवय लावणे
* पाल्य आजारी पडल्यास त्याला शाळेत पाठवू नये
* आवश्यक वेळेसाठीच मुलांना मोबाइल फोन द्यावेत
राज्य शासनाचे आदेश आल्यानंतरच जिल्हा परिषदेच्या शाळा सुरू करण्याबाबतचे नियोजन करुन त्याची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. सोमवारी ऑनलाइन शाळा सुरू झालेली नाही.
– सुनील कुऱ्हाडे, प्राथमिक शिक्षणाधिकारी, जि.प., पुणे