पुणे,{प्रभात वृत्तसेवा}- लोकसभा निवडणूक काळात आयोगाच्या नियमावलीचे काटेकोर पालन सर्व संबंधितांकडून केले जाईल, कुठल्याही प्रकारे पैसे, तसेच बळाचा दुरुपयोग निवडणूक प्रक्रियेत होणार नाही, यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी सतर्क रहावे. तसेच राज्यभरात सर्व ठिकाणी पुरेशा प्रमाणात तपासणी पथक, तपासणी नाके उपलब्ध राहतील, याची यंत्रणांनी खबरदारी घ्यावी, अशा सूचना मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांनी दिल्या आहेत.
मंत्रालय येथे आयोजित बैठकीत त्यांनी राज्य उत्पादन शुल्क, पोलीस, कस्टम, आयकर, केंद्रीय सेवा शुल्क, टपाल विभाग, रेल्वे, विमानतळ प्राधिकरण, सागरी सुरक्षा विभाग, वन विभाग यांना सूचना दिल्या आहेत.
चोक्कलिंगम म्हणाले, निवडणूक आयोगाने दिलेल्या अधिकाराचा तसेच आपल्या यंत्रणांकडे असलेल्या अधिकारांचा योग्य वापर करुन प्रभावीपणे निवडणूक प्रक्रियेत करण्यात येणारा पैसा, बळाचा संभाव्य दुरूपयोग रोखावा. अशा प्रकारचे बेकायदेशीर कृत्य करणाऱ्या दोषींवर कारवाई करावी.
या संदर्भात नियमितपणे निवडणूक आयोगाला, मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयास अहवाल द्यावा. यासंदर्भातील सर्व कार्यवाही तत्परतेने करावी. या सर्व प्रक्रियेत विविध यंत्रणा असून सर्व यंत्रणांनी परस्पर समन्वयाने अपप्रकार रोखण्यासाठी यशस्वी नियंत्रण ठेवावे.
राज्यातील सर्व विमानतळे, रेल्वे स्थानके, बंदरे, सागरी किनारे या ठिकाणी बारकाईने लक्ष ठेवावे, संशयास्पद बाबी आढळताच कसून तपासणी करावी. वन विभागानेही चेकपोस्ट ठेवावेत. तटरक्षक दल, पोलीस, कस्टम या तिन्ही यंत्रणांनी समुद्र मार्गे कुठल्याही प्रकारची बेकायदेशीर आवक-जावक, वाहतूक, होणार नाही याची काळजी घ्यावी. एस. चोक्कलिंगम, मुख्य निवडणूक अधिकारी