पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – “लोकसभा निवडणुकीत काॅग्रेसच्या वाट्याला आलेल्या पुणे लोकसभा मतदारसंघाचा काॅंग्रेसचा उमेदवार अद्याप ठरलेला नाही. पण, पुण्यातून मीच निवडणुकीच्या रिंगणात उतरावे, अशी कार्यकर्त्यांची आग्रही भूमिका आहे,’ असे सांगत खुद्द शरद पवार यांनीच सांगत राजकीय गुगली टाकली आहे. मात्र, “लगेचच माझ्या डोक्यात तसा विचार नाही’ अशी गुगली टाकत त्यांची इच्छुकांची चांगलीच फिरकी घेतली आहे.
मंगळवारी पुण्यात मोदीबागेतील निवासस्थानी पवार यांना भेटण्यासाठी गेलेल्या माध्यम प्रतिनिधींशी त्यांनी अनौपचारिक गप्पा केल्या. यावेळी त्यांनी लोकसभा निवडणुकांची गणिते, राजकीय समीकरणे, निवडणुकांची तयारी यावर मुद्दे मांडले.
पवार यांनी बुधवारी केलेल्या या वक्तव्यांची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगली असून, इच्छुकांच्या पोटात गोळा आला आहे. तर, कार्यकर्त्यांकडून या निर्णयाचे स्वागत करण्यात आले आहे. २०१७ च्या महापालिका निवडणुकांमध्ये आणि त्यानंतर २०१९ मध्ये विधानसभा निवडणुकांमध्ये पुण्यात सहामधील दोन जागा राष्ट्रवादीला मिळाल्याने लोकसभा निवडणुकीच्या एक वर्ष आधीपासूनच राष्ट्रवादी काॅग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या पदाधिकाऱ्यांकडून पुण्याच्या लोकसभेच्या जागेची मागणी केली जात आहे.
दरम्यान पवार म्हणले, “मला पुणे, माढा, साताऱ्यातून लोकसभा निवडणूक लढविण्याचा कार्यकर्त्यांचा आग्रह आहे. पण, आतापर्यंत मी १४ निवडणुका लढवल्या आणि जिंकल्या आहेत. मात्र, आता निवडणूक लढविणार नसल्याचे या आधीच जाहीर केलेले आहे. यामुळे आणखी किती निवडणूक लढविणार?’ असेही ते म्हणाले.
विधानाचा अर्थ नेमका काय ?
पुणे लोकसभेसाठी भाजपने उमेदवार जाहीर करत आघाडी घेतली असली, तरी महाविकास आघाडीकडून आतापर्यंत पुण्याबाबत काहीही स्पष्ट केलेले नाही. असे असतानाच पवार यांच्या वक्तव्याचे उलटसुलट अर्थ काढले जात आहे. पवार यांचे कोणतेही वक्तव्य सहजासहजी लक्षात येत नाही. त्यांच्या प्रत्येक वक्तव्याचे राजकीय अर्थ असतात, त्यामुळे पुण्याबाबत त्यांचे वक्तव्य नेमके कशाचे सूचक आहे, अशी चर्चा पुण्यात रंगली आहे.