राष्ट्रवादी कॉंग्रेसकडे इच्छुकांची गर्दी : आघाडीची उमेदवारी कॉंग्रेसच्या पारड्यात जाणार?
नीलकंठ मोहिते
रेडा – विधानसभेला इंदापूर तालुक्यात राजकीय दंगल कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस तसेच भाजप- शिवसेना पक्षातील उमेदवारीसाठी इच्छुक असलेल्या मातब्बरांमध्ये रंगणार असली तरी इंदापूर तालुक्यातील राष्ट्रवादी कॉंग्रेसमधील इच्छुकांची गर्दी जास्त आहे. अनेकजण एकमेकाविरोधात दंड थोपटणार, अशी चर्चा रंगली आहे.
तालुक्यात दबावतंत्राची राजकीय दंगल रंगणार आहे. आमदारकीच्या रेसमध्ये राष्ट्रवादीमधून आमदार दत्तात्रय भरणे, पुणे जिल्हा परिषदेचे बांधकाम सभापती प्रवीण माने, इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अप्पासाहेब जगदाळे यांच्यासह आणखी तीन ते चार नेते आहेत. परंतु माजी मंत्री व कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते हर्षवर्धन पाटील हे निवडणूक लढवणारच, याची घोषणा काही महिन्यांतच खुद्द पाटील यांनी स्वतः केली होती. त्यामुळे कॉंग्रेसच्या वतीने हर्षवर्धन पाटील उमेदवारीसाठी आग्रही आहेत.
लोकसभा निवडणुकीत आघाडी धर्माचे पालन करीत माजी मंत्री पाटील यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसला तोलामोलाची साथ दिली होती. त्यामुळे विधानसभेला आघाडीची उमेदवारी देताना पाटील यांचा विचार केला जाईल, असा आशावाद कॉंग्रेस कार्यकर्त्यांना दिसत आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे विद्यमान आमदार दत्तात्रय भरणे यांनी कोट्यवधी रकमेचा निधी तालुक्याच्या पदरात पाडून
घेतला आहे.
जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे सभापती प्रवीण माने यांनीही रस्त्यांसाठी अक्षरश: निधी ओतला आहे. सभापती माने यांनी सामाजिक उपक्रम राबविले आहेत. त्यातून युवकांसह सर्वचस्तरातून माने यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीच्या माध्यमातून विधानसभा लढवावी, अशी आग्रही मागणी होऊ लागली आहे. दुष्काळी पट्टयातील 22 गावांतून तसेच नीरा नरसिंहपूर, बावडा भागातून कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अप्पासाहेब जगदाळे यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या या माध्यमातून विधानसभा लढवावी, असा आग्रह होत आहे.र् ें
आघाडी धर्माचे गणित चुकले तर…
इंदापूर तालुक्यात राजकीय उलथापालथ पुढील पंधरा दिवसांत दिसणार आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसमधील इच्छुकांच्या गर्दीला राज्याचे माजी मुख्यमंत्री अजित पवार व पक्षाध्यक्ष शरद पवार आवर घालणार का?, हा कळीचा मुद्दा आहे. इंदापूरच्या आखाड्यात उमेदवारी देताना गफलत झाली तर भाजपच्या फायद्याचे होणार आहे, हे मात्र निश्चित.
पक्षनिष्ठ नेते भाजपपासून दूरच
राज्यामध्ये अनेक तालुक्यांतील राष्ट्रवादी कॉंग्रेस व कॉंग्रेसमधील मातब्बरांनी भाजपमध्ये प्रवेश करून राष्ट्रवादी कॉंग्रेस व कॉंग्रेसला सोडचिठ्ठी देण्याचे धोरण आखलेले दिसत आहे. ही परिस्थिती इंदापूर तालुक्यात मागील दोन महिन्यांत होणार, अशा चर्चा रंगल्या होत्या. परंतु, राष्ट्रवादी कॉंग्रेसमधील मातब्बर नेते पक्षनिष्ठा जपत भाजपमध्ये जाण्याच्या हालचालीपासून कोसो दूर राहत आहेत. त्यामुळे अंतर्गत समझोता हाच आघाडीला विजयापर्यंत घेऊन जाणार आहे.