Hemant Patil : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांनी राज्य सरकारला 24 डिसेंबर पर्यंतची मुदत दिली आहे. त्यानुसार आता राज्य सरकारकडून देखील प्रयत्न केले जात आहे. मध्यंतरी मराठा आरक्षणाच्या मुद्दयाप्रकरणी हा वाद पेटला होता. तसेच राजकीय पुढाऱ्यांना गावबंदी करण्यात आली होती. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यांवरुन शिंदे गटाचे खासदार हेमंत पाटील यांनी खासदारकीचा राजीनामा दिला होता. त्यावरून आता राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी थेट खासदार हेमंत पाटील यांना लोकसभेत हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.
अलीकडेच मराठा समाजानं आरक्षणासाठी ठिकठिकाणी आंदोलने केली. त्यावेळी लोकप्रतिनिधींनाही जाब विचारण्यात आला. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी हेमंत पाटील यांनी खासदारकीचा राजीनामा दिला. पद येतील आणि जातील परंतु समाज कायम सोबत राहील असं विधान करत त्यांनी खासदारकीचा त्याग करत असल्याचे पत्र लोकसभा अध्यक्षांकडे पाठवले होते. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडे खासदारकीचा राजीनामा सुपूर्द केल्यापासून हेमंत पाटील संसदीय कामकाजापासून दूर झाले होते.
परंतु आता राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी हेमंत पाटील यांना समन्स जारी करत येत्या ४ डिसेंबरला लोकसभेत हजर राहण्यास सांगितले आहे. हेमंत पाटील यांनी २९ ऑक्टोबरला खासदारकीचा राजीनामा दिला होता. त्याचसोबत ३१ ऑक्टोबरला दिल्लीतील महाराष्ट्र सदनात असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यासमोरही पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी उपोषण केले होते. दरम्यान, हेमंत पाटील यांनी शिवसेनेच्या तिकीटावर हिंगोली लोकसभा निवडणूक लढवली होती. त्याठिकाणी ते विजयी झाले. परंतु २०२२ मध्ये घडलेल्या राजकीय घडामोडीत हेमंत पाटील यांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसोबत सहभागी होण्याचा निर्णय घेतला.