पूर्वपदावर आल्यावर कराडात रक्षाबंधनाची तयारी

ठिकठिकाणी राख्यांची दुकाने सजली; खरेदीसाठी महिलांची गर्दी

कराड – बहीण-भावाच्या प्रेमाचे प्रतीक असलेला रक्षाबंधन सण गुरूवारी साजरा होत असला तरी गेली आठवडाभर कराड शहर महापुराच्या संकटात सापडल्याने बाजारपेठ बंदच होती. दोनच दिवसापूर्वी पूर ओसरल्याने कराडची बाजारपेठ पूर्वपदावर येवू लागली आहे. रक्षाबंधन सणानिमित्त शहरात ठिकठिकाणी आकर्षक राख्यांची दुकाने सजू लागली असून राख्या खरेदीसाठी युवती, महिला दुकानांमधून गर्दी करु लागल्या आहेत.

दरम्यान, कराडमधील निर्माण झालेल्या पूरपरिस्थितीचा रक्षाबंधन सणावर परिणाम झाल्याचे दिसून येत आहे. नोकरी-व्यवसायाच्या निमित्ताने परगावी असणाऱ्या भावांना महिला पोस्टाने अथवा कुरियरने राख्या पाठवत असतात. त्यामुळे शहरात रक्षाबंधनच्या पंधरा दिवस आधीपासूनच राख्यांची दुकाने सजलेली दिसतात.

यावर्षी मात्र कृष्णा-कोयना नद्यांना आलेल्या पुरामुळे कराड शहरात पाणी येवूनही पूरस्थिती निर्माण झाल्याने शहरातील बहुतांश बाजारपेठ बंदच होती. त्यामुळे रक्षाबंधन जवळ आले तरी राख्यांचे स्टॉल लागलेले दिसून येत नव्हते. मात्र पूर ओसरल्यानंतर मात्र कराडची बाजारपेठ पूर्वपदावर येवू लागल्याने दोन दिवसांपासून शहरात ठिकठिकाणी आकर्षक राख्यांनी दुकाने सजली आहेत.

सध्या बाजारात एक रुपयांपासून ते सातशे रुपयापर्यंतच्या राख्या विक्रीसाठी ठेवण्यात आल्या आहेत. यामध्ये डायमंड, वेलवेट, मेटल, टॉईज, चांदी, स्पिनर, बुट्टी, जर्दोशी राख्यांसह पारंपारिक रेशीम, चंदन, दोरी, स्पंजच्या राख्याही बाजारात विक्रीसाठी आलेल्या आहेत. लहान मुलांना आकर्षित करणाऱ्या छोटा भीम, लाईटींगच्या राख्यांना मागणी चांगली असल्याचे विक्रेते सांगत आहेत. पूर ओसरल्याने व पावसाने उघडीप दिल्याने राख्या खरेदीसाठी महिलांची गर्दी होवू लागली असल्याचेही चित्र बाजारपेठेत पहावयास मिळत आहे. शाळा, महाविद्यालये बंद असल्याने राख्या खरेदीवर परिणाम झाला आहे.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.