वॉशिंग्टन – अफगाणिस्तानमध्ये अडकलेल्या न्यूझिलंडच्या गर्भवती पत्रकार महिलेने मदतीसाठी चक्क तालिबानला आवाहन केले आहे. करोनाच्या साथीला रोखण्यासाठी न्यूझिलंडने कठोर उपाययोजना अवलंबल्या आहेत. त्यामुळे या पत्रकार महिलेला न्यूझिलंडने मायदेशी परत येण्यासाठी कोणतीही मदत करण्यास असमर्थता दर्शवली आहे. त्यामुळे आता नाईलाजाने या महिलेने तालिबानची मदत मागितली आहे.
कार्लोट बेलिस असे या पत्रकार महिलेचे नाव आहे. न्यूझिलंडमधून प्रसिद्ध होणाऱ्या “द न्यूझिलंड हेरॉल्ड’ या दैनिकामध्ये लिहिलेल्या एका लेखामध्ये त्यांनी आपली व्यथा मांडली आहे. एकेकाळी महिलांबाबतच्या वर्तनावरून तालिबानवर प्रश्न उपस्थित करत होते. मात्र आता हेच प्रश्न आपल्या स्वतःच्या देशासाठी उपस्थित करावे लागत असल्याची दुर्दैवी वेळ आपल्यावर आली असल्याचे त्यांनी या लेखात नमूद केले आहे. जर तालिबानकडून एका अविवाहित आणि गर्भवती महिलेला आश्रय दिला जात असेल, तर आपल्या देशातील स्थिती तुलनेने अतिशय वाईट आहे, असे समजायला लागले, असे त्यांनी म्हटले आहे.
न्यूझिलंडमधील कोविड-19 चे आपत्ती प्रतिसाद मंत्री ख्रिस हिपकिन्स यांनी बेलिस यांना मायदेशी आणण्यासाठी काय करता येऊ शकेल, याची तपासणी करण्याचे आदेश आपल्या प्रशासनाला दिले आहेत. मात्र प्रत्यक्ष काय कृती केली जाणार आहे, हे मात्र समजू शकलेले नाही. विदेशातून परत आलेल्या व्यक्तींना हॉटेलमध्ये 10 दिवस विलगीकरणात रहाणे न्यूझिलंडमध्ये अनिवार्य करण्यात आले आहे.
अमेरिकेचे सैन्य माघारी घेतले जात असताना कार्लोट बेलिस या अफगाणिस्तानमध्ये अल जजीरासाठी वार्तांकन करत होत्या. तालिबानी म्होरक्यांना महिलांबाबतच्या धोरणाचे प्रश्न विचारल्यामुळे त्या अचानक प्रकाशझोतात आल्या होत्या.