ठाणे – महापालिकेच्या अधिकाऱ्यावर हल्ला केल्याप्रकरणी ठाणे न्यायालयाने राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते आणि माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांना अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. ठाणे महापालिकेचे सहाय्यक महापालिका आयुक्त महेश आहेर यांना मारहाण केल्याप्रकरणी आव्हाड आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या काही कार्यकर्त्यांवर दाखल झालेल्या गुन्ह्यात अतिरिक्त सत्र न्यायाधीश ए एस भागवत यांनी शुक्रवारी अटकपूर्व जामीन मंजूर केला.
15 फेब्रुवारी रोजी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी आहेर यांना धमक्या दिल्याची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती. या प्रकरणात नौपाडा पोलिसांनी आमदार आव्हाड आणि इतर सहा जणांवर कलम 353, 307 (हत्येचा प्रयत्न) आणि शस्त्रास्त्र कायद्याच्या इतर संबंधित तरतुदींनुसार गुन्हा दाखल केला होता.
आव्हाड यांनी आपल्या अर्जात म्हटले आहे की, आपल्याला या प्रकरणात खोटे गोवण्यात आले असून, आपल्याविरुद्ध प्रथमदर्शनी कोणताही गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही.