कोल्हापूर : उसतोड कामगार महिलेची रस्त्यावरच प्रसुती झाल्याची घटना कोल्हापूर जिल्ह्यीतील निपाणी ते गारगोटी रस्यावर घडली आहे. यावेळी महिलेची त्यांच्या उसतोड टोळीतील महिलांनीच प्रसुती केली. दरम्यान कोणतेही आवश्यक साहित्य उपलब्ध नसल्याने चक्क खुरप्याने बाळाची नाळ कापण्यात आली.
मिळालेल्या माहितीनुसार, सध्या राज्यात विविध ठिकाणी उसतोडणी सुरु आहे. जिल्ह्यातील निपाणी आणि गारगोटी परिसरातही उसतोडणी सुरु आहे. रयत साखर कारखान्याची ऊस वाहतूक करणारी टोळी निपाणी परिसरात कार्यरत होती. तर त्यांच्या टोळीतील काही जण हे गारगोटी येथे होती. यावेळी काही कामगार हे निपाणीहून गारगोटीकडे ट्रॅक्टरमधून जात होती. हा रस्ता खड्डेमय असल्याने महिलेला प्रसुती कळा येण्यास सुरुवात झाली. जवळपास कोणतीही सुविधा नसल्याने अखेर रस्त्यातच प्रसुती करण्यात आली. बाळाची नाळ खुरप्याने कापल्याने मोठा रक्तस्त्राव होत होता.
त्याच रस्त्याने संदीप पाटील हा युवक जात होता. त्याने तात्काळ यमगे येथिल प्राथमिक केंद्रातील आशासेविका यांना या घटनेची माहिती दिली. त्यानंतर तातडीने तेथिल डाॅक्टर, आशासेविका यांना घटनास्थळी धाव घेतली आणि पुढील प्रक्रिया केली. डाॅक्टरांच्या तत्परतेने महिला आणि बाळ दोघेही सुखरूप आहेत. सध्या त्यांच्यावर अधिक उपचार सुरु आहेत.