पिंपरी – प्रशासनाने केलेल्या चांगल्या कामाचे श्रेय सत्ताधारी पक्ष नेहमीच घेतो. मात्र पद्मश्री प्राप्त गिरीश प्रभुणे यांच्या संस्थेला थकीत मिळकतकराबाबत नोटीस पाठविल्याबाबत कानावर हात ठेवत याबाबत प्रशासनाकडे बोट दाखविले.
गिरीश प्रभुणे यांच्या पुर्नरूथ्थान समरसता गुरूकुलम या संस्थेला थकीत मिळकतरापोटी नुकतीच पिंपरी चिंचवड महापालिकेने जप्तीची नोटीस पाठविली आहे. याबाबत विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांना विचारले असता त्यांनी थेट प्रशासनाकडे बोट दाखविले.
थकीत मिळकत वसूलीबाबत प्रशासन निर्णय घेते. यात सत्ताधारी पक्ष, महापौर, सत्तारूढ पक्षनेता यांना माहिती नसते. जर महापालिकेने प्रभुणे यांच्या संस्थेला नोटीस पाठविली असेल तर याबाबत पक्षाचे स्थानिक नेते निर्णय घेतील. प्रभुणे यांच्या पुरस्काराचा मान राखला जाईल, असेही त्यांनी सांगितले.
राजशिष्टाचार न पाळल्याने घरकुलाची सोडत आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी रद्द केली. त्यावेळी सत्ताधारी पक्षाने आगपाखड केली. मात्र प्रभुणे यांच्या संस्थेला नोटीस पाठविल्यावर सत्ताधारी पक्षाने याबाबत एक अक्षरही काढले नाही. यामुळे भाजपची दुटप्पी भूमिका उघड झाल्याची चर्चा सुरू आहे.