मुंबई – मुंबै बँकेच्या निवडणुकीत स्वत: मजूर म्हणायचे आणि विधान परिषदेच्या निवडणूक प्रतिज्ञापत्रात स्वतःला उद्योजक म्हणायचे काम विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी केले आहे. त्यामुळे दरेकर यांना या पदावर राहण्याचा नैतिक अधिकार नाही, असा निशाणा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश प्रवक्ते महेश तपासे यांनी साधला आहे.
अशी धुळफेक केवळ भारतीय जनता पार्टीचे नेतेच करू शकतात, असा टोलाही त्यांनी लगावला. केंद्रीय सहकार व गृहमंत्री अमित शाह यांच्या पक्षातील एक नेता अशाप्रकारे लोकांच्या डोळ्यात धूळ फेकण्याचे काम करतो तेव्हा भाजपची नैतिकता कुठे आहे हा प्रश्न उपस्थित होतो.
दरेकर यांच्या कृत्यावर महाराष्ट्रातील सहकार विभागाने कारवाई करून सर्व घटना जनतेपुढे आणली आहे. त्यामुळे लोकांची फसवणूक करणाऱ्या प्रविण दरेकर यांना सार्वजनिक जीवनात राहण्याचा कोणताही अधिकार नाही. त्यांनी तात्काळ विरोधी पक्ष नेतेपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी महेश तपासे यांनी केली आहे.