लखनौ – उत्तर प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीत बुलडोझरचा मुद्दा चांगलाच गाजला. त्याच बुलडोझरचा आधार घेत युपी पोलिसांनी बलात्कारातील आरोपीला दोन तासात आत्मसमर्पण करण्यास भाग पाडले आहे. पोलिसांच्या या कामगिरीचे शहरात कौतुक होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, प्रतापगड जिल्ह्यातील रहिवासी शुभम मोडनवाल प्रतापगड रेल्वे स्थानकाजवळ शौचालय चालवतो. शनिवारी एक महिला फ्रेश होण्यासाठी शौचालयात आली असता त्याने त्या महिलेवर बलात्कार केला. या घटनेनंतर तो घटनास्थळावरून पळून गेला. पोलिसांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी प्रथम पीडितेचे मेडिकल केले. त्यातच बलात्काराची पुष्टी झाल्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांना धक्काच बसला. पोलिसांचे एक पथक आरोपी शुभम मोडनवालच्या घरावर छापा टाकण्यासाठी पाठवण्यात आले होते, पण तो फरार असल्याचे आढळून आले.
त्याला पकडण्यासाठी पोलिसांच्या पथकांनी अनेक ठिकाणी छापे टाकले मात्र तो सापडला नाही. यानंतर पोलीस अधिकाऱ्यांनी याप्रकरणी कठोर भूमिका घेण्याचा निर्णय घेतला. यानंतर पोलीस अधिकारी बुलडोझरसह आरोपीच्या घरी पोहोचले आणि शुभमने 24 तासांत आत्मसमर्पण न केल्यास त्याचे घर पाडू, असा इशारा त्याच्या कुटुंबीयांना दिला.
हा इशारा दिल्यानंतर पोलिसांचे पथक बुलडोझरसह त्याच्या घरासमोर दाखल झाले. ही माहिती कुटुंबीयांनी ओळखीच्या व्यक्तींमार्फत शुभम मोडनवालला दिली असता तो घाबरला. आणि अवघ्या 2 तासांत त्याने शहरातील भगवा जकात नाका येथे हजर असल्याची माहिती पोलिसांना दिली. यानंतर पोलिसांच्या पथकाने जकात नाक्यावर जाऊन त्याला अटक केली. दरम्यान, पोलिसांच्या या बुलडोझर मोहिमेचे शहरवासीयांकडून कौतुक होत आहे. पोलिसांनी अशी कठोर भूमिका चोरट्यांविरुद्ध घ्यायला हवी, असे लोकांचे म्हणणे आहे. यामुळे कायद्याचा धाक वाढेल आणि गुन्हेगारी कमी होईल.