नितीश कुमार यांनी राजीनामा द्यावा – प्रशांत किशोर

बिहारमध्ये परतणाऱ्यांचे हाल पाहून  संतप्त

नवी दिल्ली – देशव्यापी लॉकडाऊनमुळे मोठ्या संख्येने बिहारी इतर राज्यांमधून आपापल्या घरी परतण्यासाठी धडपडत आहेत. त्यातील अनेकांचे बिहारमध्ये परतूनही मोठे हाल होत आहेत. ते पाहून निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर संतप्त झाले. त्यातून त्यांनी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी केली.

बिहार सरकारने इतर राज्यांमधून परतलेल्यांसाठी विलगीकरण कक्षांची व्यवस्था केली आहे. मात्र, त्या कक्षांमध्ये स्वराज्यात परतलेल्यांचे हाल होत असल्याचा दर्शवणारा एक व्हिडीओ प्रसिद्ध झाला आहे. त्या व्हिडीओत एका ठिकाणी जवळपास डांबून ठेवण्यात आलेले लोक दिसतात. त्यातील एक जण तर रडत-रडत हालअपेष्टा सांगताना दिसतो. तो व्हिडीओ ट्‌विटरवर पोस्ट करून किशोर यांनी नितीश यांच्यावर निशाणा साधला. करोना संसर्गापासून लोकांना वाचवण्यासाठी सुरू असलेल्या सरकारी प्रयत्नांचे आणखी एक भीतिदायक चित्र समोर आले आहे.

नितीश यांनी केलेली व्यवस्था हृदय पिळवटून टाकणारी आहे. नितीश यांनी राजीनामा द्यायला हवा, असे किशोर यांनी म्हटले. एकेकाळी किशोर हे नितीश यांचे निकटवर्तीय होते. मात्र, त्यांच्यातील मतभेद वाढल्याने किशोर यांची नितीश यांच्या नेतृत्वाखालील जेडीयूमधून हकालपट्टी करण्यात आली. त्यानंतर किशोर सातत्याने नितीश यांच्यावर टीकेची झोड उठवत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.