रांची – माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी इंडियन प्रीमिअर लीग यंदा रद्द झाली तरीही भारतीय संघात पुनरागमन करेल असा विश्वास त्याचे लहानपणीचे प्रशिक्षक केशव बॅनर्जी यांनी व्यक्त केला आहे.
ऑस्ट्रेलियात ऑक्टोबरमध्ये टी-20 विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धा होत असून या स्पर्धेत धोनी निश्चितच भारतीय संघात असेल. मात्र, त्यानंतर तो निवृत्तीचा निर्णय घेऊ शकतो. भारतीय क्रिकेट साठी त्याने दिलेले योगदान लक्षात घेता निवड समितीने त्याला ही अखेरची संधी द्यायला पाहिजे.
धोनीकडे अद्याप एक ते दोन वर्षांचे क्रिकेट बाकी आहे. त्याची तंदुरुस्ती चांगली आहे, तो जवळपास 8 महिन्यांनी नेटमध्ये सराव करण्यासाठीही उतरला होता. आयपीएलच्या चेन्नई संघाच्या सराव शिबिरातही त्याने सराव केला होता. त्यामुळे त्यालाही संघात स्थान मिळविण्याचा विश्वास आहे हेच सिद्ध होते, असेही बॅनर्जी यांनी सांगितले. गेल्या वर्षी इंग्लंडमध्ये झालेल्या विश्वकरंडक
स्पर्धेतील न्यूझीलंडविरुद्धच्या उपांत्य सामन्यानंतर धोनीने क्रिकेटमधून विश्रांती घेतली होती. आता तो पुन्हा एकदा पुनरागमनासाठी सज्ज झाला आहे.
मध्यंतरीच्या काळात तो संघात पुनरागमन करणार की निवृत्ती घेणार यावर बरीच चर्चा रंगली होती. धोनीने विश्रांती घेतल्यानंतर निवड समितीने ऋषभ पंत, संजू सॅमसन, दीनेश कार्तिक यांच्यासह अनेक नवोदीत यष्टीरक्षक फलंदाजांना संघात संधी देण्यात आली होती, त्यातही पंतला वारंवार संधी देऊनही तो अपयशी ठरत होता, त्यामुळे त्याच्यासह निवड समितीवरही टीका होत होती.
अशा परिस्थितीत कर्णधार विराट कोहलीने लोकेश राहुल याच्यावर फलंदाजीबरोबरच यष्टिरक्षणाचीही जबाबदारी सोपविली होती. राहुलनेही आपल्यावरची कामगिरी अत्यंत चांगल्या पद्धतीने सांभाळली. मात्र, टी-20 विश्वकरंडक स्पर्धेत असा पर्यायी यष्टिरक्षक नियुक्त करणे संघासाठी नुकसान ठरेल असे निवड समितीनेच स्पष्ट केले असल्याने धोनीला अखेरची संधी मिळण्याची शक्यता वाढली आहे.