मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केल्यास महामारी पसरते, अशी अंधश्रद्धा पसरवणाऱ्यांवर कायद्याने कारवाई करण्याची मागणी शिवसेनेने केली आहे. तसेच भाजपचे प्रदेश प्रवक्ते अवधूत वाघ यांच्यावर निशाणा साधला आहे.
राज्याचे मंत्री आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी नुकतीच देशव्यापी लॉकडाऊनच्या घोषणेवरून मोदींवर टीका केली. रात्री 8 वाजता जाहीर करायला लॉकडाऊन म्हणजे नोटाबंदी नव्हे. लॉकडाऊनची घोषणा करण्याआधी स्थलांतरित मजुरांना तयारीसाठी वेळ द्यायला हवा होता, अशी भूमिका पाटील यांनी मांडली. त्यावर प्रतिक्रिया देताना वाघ यांनी पाटील यांच्या सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर मतदारसंघात करोनाबाधित आढळल्याचा संदर्भ दिला. मोदींवर टीका केल्याची शिक्षा पाटील यांना मिळाल्याचा अजब निष्कर्ष वाघ यांनी काढला. त्याचा खरपूस समाचार शिवसेनेने आपले मुखपत्र असणाऱ्या दैनिकातील अग्रलेखातून घेतला.
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे मोदींचे पक्के चाहते आहेत. तरीही करोनाने अमेरिकेत हाहाकार उडवला आहे. त्या देशातील न्यूयॉर्क शहरात भीषण स्थिती आहे. अमेरिकेतील न्यूयॉर्क आणि सांगलीतील इस्लामपूर या शहरांना कोणी शिक्षा दिली याचा खुलासा कुणी करेल काय? मोदींवर टीका करण्याची शिक्षा मृत्यूदंडाच्या रूपाने मिळावी, असे भाजप प्रवक्त्यांना बहुधा वाटत असावे. देशातील वातावरण काय आहे आणि हे लोक काय पद्धतीने अकलेचे तारे तोडत आहेत? मोदी विष्णूचे अवतार आहेत, अशी मुक्ताफळे उधळणाऱ्यांनीच महाराष्ट्राला करोनाचा शाप दिल्याचे कुणी म्हटले तर? स्वत:ला मोदीभक्त म्हणवून घेणाऱ्यांचे मेंदू सडले आहेत, असे टीकास्त्र अग्रलेखातून सोडण्यात आले आहे.