पाटणा, -निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी बिहारमधून राजकारणाचा श्रीगणेशा करण्याचे संकेत दिले आहेत. अर्थात, नवा राजकीय पक्ष स्थापणार की केवळ जनसंपर्क अभियान हाती घेणार याविषयी त्यांनी तूर्त तरी सस्पेन्स निर्माण केला आहे. किशोर 5 मे यादिवशी पत्रकार परिषद घेऊन पुढील वाटचालीची माहिती देणार असल्याचे समजते.
विविध राजकीय पक्षांच्या विजयात मोलाचा हातभार लावल्याने किशोर काही वर्षांपासून चर्चेत आहेत. मागील काही दिवस त्यांच्या संभाव्य कॉंग्रेस प्रवेशाचा मोठा गाजावाजा झाला. मात्र, काही तरी बिनसले अन् मागील आठवड्यात किशोर यांनी कॉंग्रेसमध्ये प्रवेश करण्यास नकार दर्शवला. त्यामुळे त्यांच्या पुढील वाटचालीबाबत तर्क-वितर्क सुरू झाले.
अशात किशोर यांनी सोमवारी एक ट्विट करत राजकीय सनसनाटी निर्माण केली. लोकशाहीतील सार्थ भागीदार बनून जनताभिमुख धोरणाला आकार देण्यास मदत करण्याची आस मी बाळगली. त्यातून मी दहा वर्षांच्या चढ-उताराचा प्रवास अनुभवला. आता चांगल्या प्रकारे मुद्दे आणि जनसुराजाचा मार्ग जाणण्यासाठी जनतेकडे जाण्याची वेळ आली आहे. प्रारंभ बिहारपासून, असे किशोर यांनी ट्विटमध्ये म्हटले.
किशोर यांना सक्रिय राजकारणात रस असल्याचे नेहमीच दिसून आले. त्यांनी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या जेडीयूत 2018 मध्ये प्रवेशही केला. मात्र, नितीश यांच्याशी मतभेद झाल्याने किशोर यांची त्या पक्षातून 2020 मध्ये हकालपट्टी करण्यात आली. त्यानंतर मागील काही दिवसांपासून त्यांच्या कॉंग्रेस प्रवेशाची चर्चा होती. मात्र, ते घडले नाही. त्यामुळे किशोर यांनी केलेल्या ट्विटनंतर ते नवा पक्ष स्थापण्याच्या विचारात असल्याचे अंदाज वर्तवले जात आहेत.