पुणे – पुढील वर्षी जानेवारी महिन्यात गोवा येथे होणाऱ्या गोवा स्केटिंग फेस्टिवलची मरोलर स्पोर्टस चॅम्पियनशिप ही प्राथमिक फेरी पिंपरी-चिंचवड येथील टेल्को स्केटिंग रींकमध्ये नुकतीच पार पडली. या स्पर्धेमध्ये हडपसरमधील मिरॅकल स्केटिंग क्लबचा खेळाडू प्रणव प्रविण गुंड याने लॉंग रेस व शॉर्ट रेस अशा दोन्ही स्पर्धात सुवर्णपदक पटकाविले.
प्रणव सध्या जयवंत पब्लिक स्कूलमध्ये चौथीच्या वर्गात शिकत आहे. प्रणवचे प्रशिक्षक विठ्ठल जाधव त्याचे कौतुक करताना म्हणाले, प्रणव हा नेहमी उत्साही असणारा मुलगा असून खेळामध्ये तो सातत्य नेहमी ठेवत असतो. वेगवेगळया विविध स्पर्धांमध्ये तो भाग घेत असून यश संपादन करत आहे. या स्पर्धेत 5 ते 14 वर्षे व त्यापुढील वयोगटातील एकूण 450 पेक्षा अधिक मुलांनी भाग घेतला.
लॉंग रेस व शॉर्ट रेस अशा दोन स्पर्धा भरवल्या होत्या. गोवा स्केटिंग फेस्टिवलमध्ये यश संपादन करणारे खेळाडू एशियन इंटरनॅशनल स्पीड स्केटिंग चॅम्पियनशिप 2024 साठी पात्र होतील. जयवंत पब्लिक स्कूलच्या वतीने प्रणवचे या यशाबद्दल अभिनंदन करण्यात आले. प्रणवचे आई वडील डॉ. मिनाक्षी व डॉ. प्रविण गुंड हे दोघेही आयुर्वेदीय डॉक्टर आहेत. डॉ. प्रविण गुंड हे पुण्यातील रसायू कॅन्सर क्लिनिक येथे सिनियर डॉक्टर, तर डॉ. मिनाक्षी आयुर्वेद कन्सल्टंट व योगा ट्रेनर आहेत.