जामखेड – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जामखेड येथे प्रचार सभेसाठी आले असता महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या शिष्टमंडळाने त्यांची भेट घेवून केंद्र सरकारने वृत्तपत्र खरेदी करणार्यांना वार्षिक पाच हजार रूपयाची सुट द्यावी, या मागणीचे निवेदन देवून चर्चा केली. पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष ओंकार दळवी यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे यांनी राज्यभर चालवलेल्या मागणीच्या चळवळीची माहिती दिली.
अहमदनगर लोकसभा मतदार संघातील भाजप महायुतीचे उमेदवार सुजय विखे यांच्या प्रचारासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जामखेड येथे (दि.9 मे) रोजी प्रचारसभा झाली. प्रचारसभेनंतर महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे जामखेड तालुकाध्यक्ष ओंकार दळवी यांच्या समवेत पदाधिकार्यांनी आमदार प्रा.राम शिंदे यांच्या माध्यमातून देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली.
भारतीय जनता पार्टीचे राज्याचे प्रमुख म्हणून पत्रकार संघाने आपल्या मागणीचे निवेदन त्यांना दिले. पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे यांनी राज्यातील लोकसभा निवडणूकीत उभा असलेल्या उमेदवारांना वृत्तपत्रांच्या मागणीचे निवेदन देण्याची मोहिम राबवली आहे. यातून वृत्तपत्रांच्या प्रश्नाकडे राज्यकर्त्यांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला जात आहे. याबाबतची सविस्तर माहिती दिली.
यापूर्वीही मला अनेक ठिकाणी पत्रकार संघाचे निवेदन मिळाले आहे, वृत्तपत्रांच्या मागण्यांबाबत आपण जातीने लक्ष घालून न्याय देण्याची भूमिका घेवू, अशी ग्वाही फडणवीस यांनी दिली. यावेळी पत्रकार संघाचे जिल्हाउपाध्याक्ष लियाकत शेख, जिल्हा कार्यकारणी सदस्य दिपक देशमाने, प्रकाश खंडागळे, शिवाजी इकडे, अक्षय ठाकरे आदि पत्रकार संघाचे पदाधिकारी उपस्थित होते.