राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धा : समृद्धी भोसले हिला कांस्यपदक
लोणावळा : महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या वतीने आळंदी येथे झालेल्या 39 व्या कुमार राज्य अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेत मावळ तालुक्यातील सडवली गावचा युवा राष्ट्रीय कुस्तीगीर प्रतीक शंकर देशमुख याने 92 किलो वजनी गटात, तर गोडूंब्रे गावचा युवामल्ल प्रतीक शिवाजी येवले याने 55 किलो वजन गटात आपआपल्या वजनी गटातील प्रतिस्पर्धी मल्लांना पराभूत करून सुवर्णपदक पटकावले आहे. पाटण गावची राष्ट्रीय महिला कुस्तीगीर समृद्धी मुकूंद भोसले हिने 22 व्या वरिष्ठ राज्य महिला अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेत 65 किलो वजनी गटात कांस्यपदक जिंकले आहे.
महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या वतीने आळंदी देवाची येथील ज्ञानदीप धर्मशाळेत 39 वी कुमार राज्य अजिंक्यपद व 22 वी वरिष्ठ राज्य महिला अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा झाली. या स्पर्धेत मावळ तालुक्यातील दोन युवा मल्लांनी नेत्रदीपक कुस्त्या करीत सुवर्णपदक, तर एका राष्ट्रीय महिला कुस्तीगिराने कांस्यपदक पटकावले आहे.
यामध्ये मावळ तालुक्यातील सडवली गावचा युवामल्ल प्रतीक शंकर देशमुख याने कुमार विभागात फ्री-स्टाइल कुस्ती प्रकरात 92 किलो वजनी गटात प्रतिस्पर्ध्यांना पराभूत करून सुवर्णपदक पटकावले आहे. यापूर्वी प्रतीक देशमुख याने नुकत्याच आसाम (गुहाटी) येथे झालेल्या “खेलो इंडिया’ क्रीडा स्पर्धेत रौप्यपदक पटकावले आहे.
तसेच राज्यस्थान (कोटा) येथे राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत कॅडेट (सबज्युनिअर) विभागात 85 किलो वजनी सुवर्णपदक, तर दिल्ली येथे झालेल्या राष्ट्रीय शालेय कुस्ती स्पर्धेत रौप्यपदक पटकावले आहे. प्रतीकने चार राष्ट्रीय स्पर्धांपैकी तीन स्पर्धेत पदकांची कमाई केली आहे.
गोडूंब्रे गावचा युवामल्ल प्रतीक शिवाजी येवले यानेही 39 व्या कुमार राज्य अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेत 55 किलो वजनी गटात प्रतिस्पर्ध्यांना पराभूत करून राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत पहिलेच सुवर्णपदक पटकावले आहे. प्रतीक येवले हा खेड तालुक्यातील कुरूळी येथे पै. दीपक डोंगरे व कुस्ती मार्गदर्शक संजय दाभाडे यांच्याकडे कुस्तीचे धडे
घेत आहे. पाटण गावची राष्ट्रीय महिला कुस्तीगीर समृद्धी मुकूंद भोसले हिने 22 व्या वरिष्ठ राज्य महिला अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेत 65 किलो वजनी गटात कांस्यपदक पटकावले.
समृद्धी ही आळंदी येथील जोग महाराज कुस्ती संकुलात आंतरराष्ट्रीय कुस्ती पंच प्रा. दिनेश गुंड यांच्याकडे कुस्तीचे प्रशिक्षण घेत आहे. समृध्दीने यापूर्वी राज्य, राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत पदकांची कमाई केली असून, जपान येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेतही पदक पटकावले होते.