ऍथलेटिक्स : देशातील 1400 धावपटूंचा टाटा अल्ट्रा मॅरेथॉनमध्ये सहभाग
लोणावळा : लोणावळा ते किल्ले तिकोना दरम्यान आयोजित देश पातळीवरील टाटा अल्ट्रा या 50 व 35 किलोमीटरच्या मॅरेथॉन स्पर्धेत पुरुष गटात किशोर गव्हाणे या स्पर्धकाने 50 किलोमीटरचे अंतर 3 तास 20 मिनिटांत पूर्ण करीत तर महिला गटात नुपूर सिंग हिने 50 किलोमीटरचे अंतर 4 तास 15 मिनिटांत पार करीत विजेतेपद पटकावले.
देशभरातील 1400 धावपटू या अल्ट्रा मॅरेथॉनमध्ये सहभागी झाले होते. यामध्ये 200 महिला स्पर्धकांचा सहभाग होता. मागील वर्षी झालेल्या अल्ट्रा रन मधील सर्व भारतीय धावपटू तसेच आर्मीचे स्पर्धक या वेळी देखील स्पर्धेत सहभागी झाले होते. मागील तीन वर्षांपासून लोणावळ्यात टाटा अल्ट्रा ही स्पर्धा आयोजित केली जाते. टाटा अल्ट्रा स्पर्धेतील पात्र खेळाडूंनाच जागतिक पातळीवर भारताचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळत असल्याने ही स्पर्धा देशभरातील खेळाडूंना जागतिक स्तरावरील अल्ट्रा स्पर्धेत सहभागी होण्याकरिता महत्वाची असते, अशी माहिती या स्पर्धेचे आयोजक व स्टायडर रेस डायरेक्टर दीपक लोंढे व अँथलेटिक फेडरेशन ऑफ इंडियाचे आनंद मेनेजेस यांनी पत्रकार परिषदेत दिली.
या स्पर्धेमधून जागतिक स्तरावरील गोल्डन लेव्हल ठरविता येते, ही स्पर्धा ही बीएसएफ मान्यताप्राप्त व एएफआयच्या नियमांप्रमाणे घेण्यात येते. भारतातील ही महत्वाची स्पर्धा असून, दरवर्षी स्पर्धेत धावपटूंचा सहभाग वाढत आहे, ही अभिमानास्पद बाब असल्याचे मेनेजेस यांनी सांगितले.