विमानात बूक केलेली सीट न मिळाल्याने कंपनीविरोधात तक्रार
नवी दिल्ली : भाजपाच्या वादग्रस्त खासदार प्रज्ञा ठाकूर पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आल्या आहेत. मात्र यावेळी त्यांनी कोणते वक्तव्य केले नाही तर त्यांनी चक्क एका खासगी विमान कंपनीविरोधात तक्रार दाखल केली आहे. त्यांनी, खासगी विमानसेवा पुरवणारी कंपनी स्पाईस जेटच्या कर्मचाऱ्यांविरोधात विमानतळ संचालकांकडे तक्रार केली आहे. स्पाईस जेटच्या विमानाने शनिवारी दिल्लीहून भोपाळमध्ये दाखल झाल्यानंतर ठाकूर यांनी विमानतळ संचालकांकडे तक्रार केली.
एका वृत्तवाहिनीच्या वृत्तानुसार, बुक केलेले सीट न मिळाल्याने नाराज झालेल्या प्रज्ञा ठाकूर भोपाळच्या विमानतळावर पोहोचल्यानंतरही काही वेळापर्यंत विमानातच बसून होत्या. मी विमानात धरणे आंदोलन केले नाही. तर, स्पाइस जेटचे कर्मचारी प्रवाशांसोबत गैरवर्तणूक करतात हे मी अधिकाऱ्यांना सांगितले. यापूर्वीही त्यांनी माझ्याशी गैरवर्तणूक केली होती आणि आज पुन्हा त्यांनी तसेच केले. मी ज्या सीटसाठी बुकिंग केले होते ते सीट मला दिले नाही.
मी नियम दाखवण्यास सांगितले तर त्यांनी नियम दाखवण्यासही नकार दिला, अखेरीस मी संचालकांना बोलावले आणि तक्रार केली, असे ठाकूर म्हणाल्या. बुक केलेले सीट न मिळाल्याबाबत तक्रार माझ्याकडे आली आहे. याबाबत सोमवारी अधिक माहिती घेतली जाईल, असे भोपाळच्या राजा भोज विमानतळाचे संचालक अनिक विक्रम यांनी सांगितले.