पिंपरी-चिंचवड शहर वेगाने विस्तारत आहे. वाढते नागरीकरण, लोकसंख्या वाढ आणि तुलनेत कमी पडणाऱ्या सुविधा अशी परिस्थिती सध्या पाहण्यास मिळत आहे. नागरिकांना किमान मूलभूत नागरी सुविधा मिळविण्यासाठी संघर्ष करावा लागतो आहे. रस्ते, पाणी, आरोग्य, वीज आदी विषयांशी संबंधित छोटे-छोटे प्रश्न सुटावेत, अशीच सर्वसामान्यांची माफक अपेक्षा आहे. या समस्या मांडण्यासाठी आम्ही आपल्याला व्यासपीठ उपलब्ध करून देत आहोत.
पालिका भवनासमोरच पाण्याची नासाडी
पिंपरी – महापालिका हद्दीत दिवसाआड पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे शहरात सतत विस्कळीत पाणीपुरवठा होत आहे. बऱ्याच ठिकाणी मुबलक पाणीपुरवठा होत नाही. त्यामुळे पाण्यासाठी शहरात सतत मोर्चा, निवेदने महापालिकेला देण्यात येत आहेत. शहरातील अनेक सोसायटींमध्ये पाणीटंचाईची मोठी समस्या असताना महापालिका भवना समोर बॅंक ऑफ इंडियाच्या शेजारी मागील कित्येक दिवसांपासून पाणीगळती होत आहे. परंतु महापालिकेचा पाणीपुरवठा विभाग याकडे दुर्लक्ष करत आहे. येथे दिवसाकाठी हजारो लिटर पाणी वाया जात आहे. परंतु प्रशासन याची दखल घेत नाही. त्यामुळे शहरातील नागरिकांमध्ये प्रशासनाविषयी संताप व्यक्त होत आहे. तरी महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने याची त्वरित दखल घेऊन येथील पाणीगळती रोखावी, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.
रस्ता दुभाजकाची दुरवस्था
पिंपरीगाव – येथून पिंपळे सौदागरकडे जाणाऱ्या रस्तयाला वाहतूक कोंडी नियंत्रणात आणण्यासाठी रस्ता दुभाजक निर्माण करण्यात आला आहे. परंतु या रहदारीच्या रस्ता दुभाजकाचे सिमेंट ब्लॉक अज्ञात वाहनाच्या धडकेने पडले आहेत. ते सिमेंट ब्लॉक रहदारीच्या रस्त्यात आले आहेत. त्यामुळे येथून ये-जा करणाऱ्या वाहनचालकांना अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. पवना नदी पुलाजवळ साधारण शंभर मीटर अंतरापर्यंत विविध ठिकाणी हे दुभाजक पडल्याने रात्री येथून सावधपणे प्रवास करावा लागत आहे. जर येथे नवीन प्रवास करणारे वाहनचालकांच्या लक्षात आले नाही तर मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता आहे. या रस्त्याच्या दुतर्फा झाडी असल्याने रात्री येथे अंधार असतो. हे रस्त्यात पडलेले सिमेंट ब्लॉक लक्षात आले नाही तर अपघात होऊ शकतो. त्यामुळे महापालिका प्रशासनाने याची दखल घेऊन त्वरित दुभाजकाची दुरुस्ती करावी, अशी मागणी स्थानिक नागरिक व वाहनचालकांकडून होत आहे.
– एस. एन. कुंभार