गुंफण : अमृतकण

अरुण गोखले

ज्ञानेश्‍वरी वाचणारी माणसं आपण खूप पाहतो. पण ज्ञानेश्‍वरी जगणारी मात्र फार थोडी माणसं आणि ती ही शोधून आपल्याला पाहायला मिळतात. आमचे आबा हे त्यातलेच एक. मी त्यांच्याकडे जातो ते त्यांच्याशी होणाऱ्या प्रत्येक भेटीतून नवं काहीतरी शिकण्यासाठी.

मागच्या रविवारचीच गोष्ट. मी जेव्हा त्यांच्याकडे गेलो तेव्हा आबा मजेत अंगणात ऊन खात बसले होते. निवृत्तीनंतरचं जीवनही ते मोठ्या आनंदाने आणि क्रियाशीलतेने जगत होते. ज्ञानेश्‍वरीच्या शिकवणीप्रमाणे त्यांनी आहार-विहार आणि आचारांनी आपल्या तना-मनाचे आरोग्य अगदी निकोप राखले होते. आताही ते मस्त ऊन खात होते आणि मुखाने हरीपाठ म्हणण्याचे आणि हाताने समोरच्या सुपातले मटार सोलण्याचे त्यांचे काम चालूच होते.

मला त्यांच्या त्या कामाशी नामाची सांगड घालणाऱ्या कृतीचे मोठे आश्‍चर्य वाटत होते. अखेर मीच न राहवून जेव्हा त्यांना विचारले की “आबा! अहो तुमचं हे काय चाललंय? तेव्हा बसायची खूण करीत ते मला समजावणीच्या स्वरात म्हणाले, “श्री, अरे हीच तर गुंफण घालायची असते प्रपंच आणि परमार्थाची. हे बघ मटार सोलून मिळतोय म्हणजे सूनबाईला प्रपंच्यात मदत होतेय आणि इकडे माझा हरीपाठ विठ्ठलाचे भजनही चालेले आहे.

म्हणजे नकळत माझ्या हातून परमार्थही घडतो आहे. बाबारे! नाही तरी ज्ञानदेवाच्या त्या क्षणभरी ह्या शब्दाचा नेमका अर्थ काय आहे? आपण आपल्या जीवनातला प्रत्येक क्षण हा वाया न घालवता तो प्रभू नामाने भरून सत्कारणी लावायचा हेच हाच ना! बस्स! आपण हे फक्‍त आचरणात आणलं ना की झालं.

सावता माळी, गोरा कुंभार, जनाबाई, तुकोबा ह्या संतांनी आपल्याला काय सांगितल आहे? काय दाखवून दिलं आहे? की बाबांनो! तुम्ही तुमच्या कामाची नामाशी सांगड घाला. त्यांना एकमेकांची जोड द्या. तसे केलं ना की कामाचे श्रम वाटत नाही आणि नामाचा विसरही पडत नाही.’

तेवढ्यात आबांची सून दोन कॉफीचे कप घेऊन आली. तिने एक कप आबांना दिला आणि दुसरा मला. सोललेले मटार आत नेताना ती म्हणाली. “आबा! आजच्या मटार उसळीच क्रेडिट तुम्हाला बरं का.’ “अगं मी काय केलंय त्यात?’ आबा म्हणाले.

खरंच किती साधं आणि सोपं होतं आबांचं जीवन, तत्त्वज्ञान, प्रपंच आणि परमार्थाची गुंफण घालण्याची कला.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.