सिनेजगत : “ओटीटी’ची शिरजोरी

सोनम परब

लॉकडाऊन काळात लोकप्रियता वाढलेला ओटीटी प्लॅटफॉर्म आज सिनेमागृहे सुरू होऊनही गती पकडून आहे. मल्टिप्लेक्‍समधील काही उणिवांचा ऍमेझॉन, नेटफ्लिक्‍स, हॉटस्टारसारखे दिग्गज ओटीटी प्लॅटफॉर्म फायदा उचलत आहेत. सध्या ते कोणताही मोठा चित्रपट कोणत्याही किमतीत पदरात पाडून घेण्याबाबत आग्रही आहेत. प्रेक्षकांना मोठे चित्रपट मोफतपणे उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न ओटीटीकडून केला जात आहेत.

करोनाकाळात बंद करण्यात आलेले चित्रपटगृहे आजही अनेक राज्यात सुरू झालेले नाहीत. काही ठिकाणी सुरू झाले असले तरी प्रेक्षकांची संख्या कमीच आहे. याबाबत प्रयागराज येथील एका प्रेक्षकाचे मत बोलके आहे. जर मल्टिप्लेक्‍सचे तिकीट 50 ते 70 रुपयांच्या आसपास ठेवले तर त्यांच्याकडे प्रेक्षकांचा कधीही दुष्काळ पडणार नाही. अर्थात, नियमिपणे चित्रपट पाहणाऱ्यांची ही व्यथा आहे. 

अनेकांना मल्टिप्लेक्‍समध्ये जाण्याची इच्छा असते. परंतु महागड्या तिकिटामुळे ते सिंगल स्क्रिनकडे जातात. म्हणूनच बहुतांश मध्यमवर्गीय कुटुंबातील एका युवक प्रेक्षकाला मिळणाऱ्या पॉकेटमनीतून मल्टिप्लेक्‍समध्ये चित्रपट पाहणे शक्‍य नाही. तेवढ्या पैशातून सिंगल स्क्रिनचे तिकीट खरेदी करता येऊ शकते. मल्टिप्लेक्‍सची ही उणीव ओटीटीवाल्यांनी जाणून घेतली आणि लॉकडाऊननंतर काही मोठे चित्रपट आपल्या माध्यमातून प्रदर्शित करण्याचा धडाका लावला. परिणामी बहुतांश बड्या मंडळीचे चित्रपट ओटीटीच्या मार्गावर आले.

दुसरीकडे मल्टिप्लेक्‍सच्या गणिताचे आकलन केल्यास बहुतांश मल्टिप्लेक्‍स हे कधीच हाउसफुल्ल जात नाहीत. कामकाजाच्या दिवशी तर प्रेक्षकांची संख्या खूपच कमी असते. त्यामुळे त्यांचे तिकीटदर कमी असणे गरजेचे आहे. या आधारावर काही प्रेक्षक मल्टिप्लेक्‍सकडे वळू शकतात. त्याचबरोबर बऱ्याच काळापासून मल्टिप्लेक्‍स आणि सिंगल स्क्रिन टॉकीज विरोधात वातावरण तयार झाले आहे. मल्टिप्लेक्‍समधील काही उणिवांचा ऍमेझॉन, नेटफ्लिक्‍स, हॉटस्टारसारखे दिग्गज ओटीटी प्लॅटफॉर्म फायदा उचलत आहेत. मल्टिप्लेक्‍स आणि सिंगल स्क्रिन हे तिकीट दर मनमानीप्रमाणे आकारत आले आहेत. तर कोणतेही अतिरिक्‍त शुल्क न आकारता नवीन चित्रपट ओटीटीवर झळकत आहेत. त्यामुळे आता ओटीटी हे मल्टिप्लेक्‍स आणि सिंगल स्क्रिनला जोरात धडक देत आहेत.

चर्चा निष्फळ
सध्या सूर्यवंशी, 83, मुंबई सागा, चेहरे, बेलबॉटम, राधे आदी चित्रपट टॉकीजवर झळकण्यासाठी आतूर झाले आहेत. यासाठी टॉकीज मालकांसह मोठे प्रायोजक देखील टॉकिज पुन्हा सुरू करण्याबाबत प्रयत्नशील आहेत. अर्थात अधिक फायद्याचे आकलनही करण्यात आले आहे. काही दिवसांपूर्वीच थिएटर मालक आणि प्रसिद्ध वितरण कंपनी रिलायन्स यांच्यातील चर्चा ही मिळणाऱ्या लाभाच्या मुद्द्यावरून थांबली.

नवीन अटी
प्रत्यक्षात चित्रपटांतून मिळणाऱ्या नफ्यात पूर्वी निर्माता आणि वितरक यांचा वाटा निम्मा-निम्मा असायचा. “यूएफओ’चा पैसा तेव्हाही निर्माताच देत होता. परंतु आता रिलायन्सने काही अटी ठेवल्या आहेत. ही कंपनी 65 टक्‍के फायदा घेण्याचा प्रस्ताव मांडत आहे आणि यूएफओ देखील टॉकीज मालकाने द्यावा, असे म्हटले आहे. साहजिकच नफ्याचे हे गणित मल्टिप्लेक्‍सला मान्य नाही. सध्या यावर तोडगा काढण्याचे जोरात प्रयत्न सुरू आहेत.

निर्मात्यांना हवा नफा
निर्मात्यांना देखील स्वत:च्या काही अडचणी आहेत. कोट्यवधी रुपये खर्च करून चित्रपट तयार करणाऱ्या निर्मात्यांना केवळ नफा हवा असतो. मनोरंजनाच्या नावावर मल्टिप्लेक्‍स कशारितीने प्रेक्षकांकडून पैसे उकळतात याच्याशी निर्मात्यांना काही देणेघेणे नसते. त्यामुळे ते मल्टिप्लेक्‍सवाल्यांच्या सर्व गोष्टी मान्य करत असतात. अशावेळी लॉकडाऊन लागू झाल्यानंतर निर्मात्यांचा कल हा ओटीटीकडे राहिला. लॉकडाऊनकाळात टॉकिज बंद राहिल्याने ओटीटीने भरपूर फायदा उचलला आणि या माध्यमातून मोठ्या प्रमाणात प्रेक्षक मिळाले.

ओटीटीवाल्यांचा खेळ
पडद्यामागे ओटीटीवाल्यांनी देखील आपला खेळ सुरू केला आहे. सध्या ते कोणताही मोठा चित्रपट कोणत्याही किमतीत पदरात पाडून घेण्याबाबत आग्रही आहेत. अमेझॉन, नेटफ्लिक्‍स, हॉटस्टार यासारख्या कंपन्यांकडे पैशाची टंचाई नाही. हे कोणताही लहान-मोठा चित्रपट खरेदी करत आहेत. दुसरीकडे स्वत: वेबसिरीजच्या माध्यमातून चित्रपटांची निर्मिती आणि वितरणदेखील करत आहेत. नेटफ्लिक्‍सचे दोन डझनाहून अधिक चित्रपट नेहमीच प्रदर्शनाच्या रांगेत उभे असतात. अशावेळी प्रेक्षकांना मोठे चित्रपट मोफतपणे उपलब्ध करून देऊन त्यांना चटक लावण्याचा प्रयत्न ओटीटीकडून केला जात आहेत. अर्थात टॉकीज सुरू झाल्यानंतर ओटीटीची लोकप्रियता कमी होऊ शकते, याची पुरेपूर जाणीव ओटीटीवाल्यांना आहे.

सिंगल स्क्रिन बंद होऊ नये
लहान शहरांतील प्रेक्षक हे सिंगल स्क्रिनच्या बाजूने आहेत. आजही या चित्रपटगृहांतील तिकीटदर हे 50 ते 100 रुपयांच्या आसपास आहे. मात्र यात आणखी कपात करणे गरजेचे आहे. ट्रेड विश्‍लेषक आमोद मेहरा यांच्या मते, मल्टिप्लेक्‍सऐवजी सिंगल स्क्रिनची देखभाल चांगली ठेवली तर फायदा आणखी वाढू शकतो. अनेक मोठ्या नायकांचा जलवा अशाच टॉकीजमधून पाहावयास मिळतो.

मल्टिप्लेक्‍सची दहशत
मल्टिप्लेक्‍सचे महागडे तिकीट आणि खानपानाच्या अव्वाच्या सव्वा किमती पाहता सर्वसामान्य प्रेक्षक याकडे फिरकत नाही. एका प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला निर्देश देत मल्टिप्लेक्‍समधील दराबाबत सहा आठवड्यांत सविस्तर धोरण आखण्यास सांगितले होते. अर्थात, या धोरणाचे पुढे काय झाले, हे कोणालाच ठाऊक नाही. वास्तविक अनेक कारणांमुळे टॉकीज मालक अडचणीत येत आहेत. अशावेळी मालकांनी काही प्रमाणात मुभा देऊन प्रेक्षकांना मल्टिप्लेक्‍सकडे वळवण्यासाठी प्रयत्न करायला हवेत.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.