पुणेकरांची दीपावलीची “सुरैल’ सुरुवात
“सिंहगड इन्स्टिट्यूट’ प्रायोजित तसेच, दै. “प्रभात’, गांधी खादी भांडारतर्फे आयोजन
पुणे: “पाहिले न मी तुला’, “मन उधाण वाऱ्याचे’, “डौल मोराच्या मानचा रं’, “का रे दुरावा, का रे अबोला’ अशा एकापेक्षा एक सरस गीतांच्या स्वरसजावटीत सजलेली आणि भल्या पहाटे रंगलेली अस्सल मराठी गीतांची मैफल पुणेकर रसिकांना दीपावलीचा प्रत्यय देऊन गेली. निमित्त होते, दै. “प्रभात’ आणि गांधी खादी भांडार आयोजित, “सिंहगड इन्स्टिट्यूट’प्रायोजित “नक्षत्रांचे गाणे’ या कार्यक्रमाचे.
नामांकित गायिका उत्तरा केळकर, गायक जितेंद्र अभ्यंकर आणि आरती दीक्षित यांनी सुरेल आवाजात सादर केलेल्या गीतांनी उपस्थितांना खिळवून ठेवले. बालगंधर्व रंगमंदिराच्या प्रतिष्ठेच्या रंगमंचावर झालेल्या या मैफिलीला शुक्रवारी सकाळी 6 वाजता प्रारंभ झाला. यावेळी दै. “प्रभात’ परिवारातील वृषाली गांधी, चंदुलाल बलाई, अतुल देशपांडे, समीर लांबट, उज्ज्वला मेहता, मेघा शहा, सुशील शहा, महावीर फलटणे, प्रीती फलटणे, सीए सुरेंद्र ब्रह्मे, सीए शर्मिला ब्रह्मे, सुनील शहा, अनिता शहा, मिलिंद तांबोळी, पाटे कन्स्ट्रक्शनचे प्रमोद वाणी, तिरूपती पतसंस्थेचे उमेश वाघे, दिशा ऍडव्हरटायझिंगचे रवी देशमुख, दै. “प्रभात’चे सरव्यवस्थापक बी. एल. स्वामी, कार्यकारी संपादक अविनाश भट आदी मान्यवर उपस्थित होते.