नव्या रशियन खलित्याचा जर्मन निवडणुकीवर घाव
वॉशिंग्टन, ता. 18 : सबंध जर्मनीत एकच हंगामी सरकार स्थापण्यासंबंधी रशियन सरकारनें अमेरिका, ब्रिटन आणि फ्रान्स या राष्ट्रांना पाठविलेल्या ताज्या खलित्यानें पश्चिम जर्मनीतील आगामी निवडणुकीवर मोठा अनिष्ट परिणाम होण्याचा संभव निर्माण झाला आहें, असें मत येथील राजकीय निरीक्षक आता बोलून दाखवूं लागलें आहेंत. कारण असें हंगामी सरकार स्थापन झाल्यास पाश्चिमात्य राष्ट्र त्रयींनी सुचविलेल्या सबंध जर्मनीत खुल्या निवडणुकी घेण्याच्या मार्गात मोठीच अडचण निर्माण होणार आहें.
अमेरिकन सरकारच्या परराष्ट्रखात्याचा एक प्रवक्ता म्हणाला, “”असें हंगामी सरकार स्थापन करणें म्हणजें पूर्व जर्मन सरकारला पश्चिम जर्मन सरकारच्या बरोबरीनें दर्जा देण्यासारखें आहें जर्मन प्रश्नांवर भरभक्कम पायावर चर्चा करण्यास रशियन सरकारने एवढे आडेवेढे कां घ्यावेत हें समजण्यास काहीं मार्ग नाहीं.”
चौराष्ट्र परिषद लांबली ….
पश्चिम जर्मनीतील निवडणुका झाल्यानंतर अमेरिका, ब्रिटन, रशिया आणि फ्रान्स या राष्ट्रांच्या परराष्ट्रमंत्र्यांची परिषद बोलाविण्याची सूचना बड्या तिघा राष्ट्रांनीं एका खलित्याच्या रूपानें रशियाकडे पाठविली होती. रशियाच्या या नव्या खलित्यानें बड्या चौराष्ट्र परराष्ट्रमंत्री परिषदेला वाटाण्याचा अक्षदाच लावल्या व ही परिषद पुढील वर्षीपर्यंत ढकलली.
मुंबई राज्यांत द्विपद विक्रीकर लवकरच जारी होणार
मुंबई, ता. 18 : मुंबई राज्यांत सध्या जारी असणारी प्रतिपद विक्रीकर पद्धती बदलण्यांत येणार असून द्विपद कर पद्धती चालू करण्यांत येणार आहें. मुंबईचा 1953 चा विक्रीकर कायदा दुरुस्त करणारे विधेयक सरकारी गॅझेटांत प्रसिद्ध करण्यांत आले आहें.
जनरल टॅक्स
यासंबंधी निघालेल्या सरकारी पत्रकात म्हटले आहे- दुरुस्त कायद्यान्वये करमाफ वस्तूखेरीज अधिकृत विक्रेत्यांकडच्या मालावर अखेरी विक्री व्यवहाराचे वेळी रुपयात 6 पै प्रमाणे जनरल टॅक्स घेण्यांत येईल. हा जनरल टॅक्स सोन्यानाण्याचे व्यवहारावर अर्धा टक्का, कच्चा कापूस व सरकीवर 1 टक्का प्रमाणें घेण्यात येईल.
डॉ. आंबेडकरांचा नियम
औरंगाबाद – डॉ. आंबेडकर यांनीच स्थापलेल्या येथील पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या कॉलेजच्या इमारतीच्या आवारात कमीत कमी एक झाड लावल्याशिवाय आपल्याला भेटायला येणाऱ्या माणसाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर भेट देत नाहींत, असें वृत्त येथे आले आहे. त्यामुळे झाले काय, तर कॉलेजच्या आवारात शेकडों झाडें तरारून उगवली आहेत. डॉ. आंबेडकर यांनी विद्यार्थ्यांच्या वसतिगृहांचें आणि प्राध्यापकांच्या राहण्याच्या इमारतींचें बांधकाम सध्या हाती घेतले असून ते सबंध देशांत आदर्श करण्याचा त्यांचा विचार आहें.