बीजिंग – चीनमधील सिच्युआन प्रांताला आज 6.8 क्षमतेच्या भूकंपाचा तीव्र धक्का बसला. सिच्युआन प्रांतातील लुडिंग भागाला दुपारी साडे 12 वाजण्याच्या सुमारास हा भूकंप जाणवला, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. (Powerful Earthquake of 6.8 magnitude kills 21 people in China) या भूकंपात 21 जण ठार झाल्याचे वृत्त मिळते आहे.
भूकंपाचा केंद्रबिंदू उत्तर अक्षांशांवर 29.59 अंशांवर आणि पूर्वेला 102.08 रेखांशांवर जमिनीखाली 16 किलोमीटरवर होता, असे चीन भूकंपशास्त्र नेटवर्क सेंटरने म्हटले आहे. भूकंपाचा हा केंद्रबिंदू लुडिंग भागापासून 39 किलोमीटरवर आहे. या बिंदूपासून 5 किलोमीटरच्या परिघामध्ये अनेक लहान लहान खेडी आहेत.
हा भूकंप 226 किलोमीटर दूर असलेल्या सिचुआन प्रांताची राजधानी चेंगडू येथेही जाणवला. भूकंपामुळे इमारतींना हादरे बसल्याचे व्हिडीओ आणि फोटोही सोशल मीडियावर पोस्ट झाले आहेत. मात्र भूकंपात झालेल्या नुकसानीची माहिती अद्याप पुढे आलेली नाही.
सिच्युआन प्रांत हा तिबेटला अगदी लागून आहे. तेथे अशाप्रकारे भूकंपाचे धक्के नेहमी जाणवत असतात. जून महिन्यात यान शहरात झालेल्या भूकंपामध्ये 4 जण ठार झाले होते आणि 14 जण जखमी झाले होते. या भूकंपाच जलविद्युत प्रकल्पाचे आणि अनेक घरांचे मोठे नुकसान झाले होते.