नसरापुरातील दाम्पत्याने केली मात; नागरिकांनी फुले उधळीत केले स्वागत
भोर (प्रतिनिधी) – भोर तालुक्यातील वीसगाव खोऱ्यातील नेरे गावच्या पाठोपाठ आता नसरापूर येथील पती पत्नी रविवारी (दि. 17) करोनामुक्त होवून घरी परतले आहे. त्यामुळे नसरापूरसह संपूर्न तालुका करोनामुक्त झाला असला तरी खबरदारी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. .
पुणे सातारा महामार्गावरील नसरापूर येथे शनिवारी (दि. 2) पहिला तर रविवारी (दि. 3) दुसरा करोनाबाधित रुग्ण आढळून आला होता. हे दोघेही पती-पत्नी असून त्यांच्यावर पुणे येथे उपचार सुरु होते. 15 दिवसांच्या यशस्वी उपचारानंतर या दाम्पत्याचे सर्व तपासणी आहवाल निगेटीव्ह आले असल्याने रविवारी त्यांना घरी सोडण्यात आले. त्यांचे नसरापुर येथे आगमन होताना ग्रामस्थ व प्रशासनाने त्यांच्यावर फुलांची उधळण करुन त्यांचे स्वागत केले.
यावेळी जिल्हा परिषद सदस्य विठ्ठल आवाळे, भोर तालुका पंचायत समितीचे माजी उपसभापती तथा विद्यमान सदस्य लहूनाना शेलार, नसरापूर ग्रामपंचायतीचे सरपंच डॉ. गणेश हिवरेकर, वैद्यकीय अधिकारी डॉ. जयदीप कापशीकर, मंडलाधिकारी एस. बी. कंडेपल्ली, जिल्हा राष्ट्रवादीचे उपाध्यक्ष गणेश बागल आदींसह नसरापूर ग्रामस्थ व पंचक्रोशितील नागरिक उपस्थित होते.