- नगरसेवकांवरील दबाव वाढला; मतदार नोंदणीचे “टार्गेट’
पिंपरी – संपूर्ण राज्यासह पिंपरी-चिंचवड शहर “करोना’मुळे सैरभर झालेले आहे. सर्वसामान्यांचा पुळका असल्याचा आव आणत भारतीय जनता पक्ष शासनाविरोधात आंदोलन करत आहे. मात्र त्यांचे खायचे आणि दाखवायचे दात वेगळे असल्याचा प्रत्यय बुधवारी (दि. 20) आला. या पक्षाच्या वरिष्ठांनी स्थानिक नगरसेवक, पदाधिकाऱ्यांवर दबाव आणत पुणे पदवीधर मतदारनोंदणीचा कार्यक्रम हाती घेत प्रत्येक प्रभागासाठी दोन हजार मतदार नोंदणीचे टार्गेट दिले आहे. त्यामुळे या पक्षाचा खरा चेहरा उघडा पडला असून नगरसेवकांमध्येही या प्रकाराबाबत प्रचंड नाराजी निर्माण झाली आहे.
पुणे पदवीधर मतदारसंघाचे आमदार चंद्रकांत पाटील हे विधानसभेवर निवडून गेल्यामुळे ही जागा रिक्त झाली आहे. तर या जागेची मुदतही येत्या दोन-तीन महिन्यांत संपुष्टात येणार असल्यामुळे या जागेसाठी कधीही निवडणूक जाहीर होवू शकते. सध्या करोनामुळे संपूर्ण राज्यात प्रचंड महामारीचे वातावरण निर्माण झाले आहे. सामाजिक संघटनांपासून ते अनेक लोकप्रतिनिधी नागरिकांना कोणत्या सुविधा उपलब्ध करून देता येतील, काम कसे सुरू होईल, नागरिकांना या महामारीपासून दूर कसे ठेवता येईल, यासाठी प्रयत्नशील आहेत.
मात्र, महापालिकेत सत्ताधारी असलेल्या भारतीय जनता पक्षाने सत्तेच्या दबावातून करोनासाठी केलेल्या खरेदीचे पितळ उघडे पडलेले असतानाच आता या करोनाच्या महामारीमध्ये पुणे पदवीधर मतदारसंघासाठी नगरसेवक, पदाधिकाऱ्यांवरील दबाव वाढविण्यास सुरुवात करण्यात आली आहे. यासाठी फोनकॉलसह व्हिडीओ कॉन्फरसिंगद्वारे संपर्क साधला जात आहे. किमान दोन हजार मतदार नोंदविण्यासाठी दबाव आणला जात असल्याचे या पक्षाच्या नगरसेवकांकडून सांगितले जात आहे. 91 4071043355 या क्रमांकाचा त्यासाठी वापर केला जात आहे.
प्रदेशस्तरावरील दोन नेत्यांसह स्थानिक पातळीवरील एक जण यासाठी दबावाचे राजकारण करण्यात मग्न आहेत. पिंपरी-चिंचवड शहरासाठी 75 हजार मतदारांच्या नोंदणीचे टार्गेट देण्यात आले असून, त्यापैकी किमार 65 हजार मतदारांच्या नोंदणीचा शब्द एका स्थानिक आमदाराने दिला आहे. ही नोंदणी करण्यासाठी आता या आमदारानेही आटापिटा चालविल्याने नगरसेवकांमधून जेरीस आल्याचा सूर उमटू लागला आहे. करोनाच्या महामारीमध्ये लोकांसाठी काय करायचे की यांच्या आमदारकीसाठी मतदार नोंदवित फिरायचा असा प्रश्न या नगरसेवकांमधून व्यक्त होत आहे.
उफरटा प्रकार सुरूच
राज्य शासन काहीच करत नसल्याची आवई उठवित भाजपाच्या प्रदेश पातळीवरून महाविकास आघाडीवर नाकर्तेपणाचे खापर फोडले जात आहे. तर स्थानिक पातळीवर येत्या दोन-तीन दिवसांत आंदोलन करण्याचे घाटत आहे. महापालिका शहरातील रुग्ण रोखण्यात अपयशी ठरली आहे. पर्यायाने सत्तेत असलेला भाजपाही अपयशी ठरला आहे. केवळ खरेदीच्या नावाखाली लूट करणारे आणि करोनाच्या महामारीमध्ये उलटा प्रकार चालविणाऱ्यांकडून “लोका सांगे ब्रम्हज्ञान, आपण कोरडे पाषाण’ या उक्तीचा प्रत्यय येत असल्याचे चित्र आहे.