‘बापटांच्या स्टंटबाजीने केली भाजपचीच फजिती’

पुणे : कोरोना साथीच्या निमित्ताने पालिका प्रशासनावर ठपका ठेवण्यासाठी खासदार बापट यांनी केलेल्या स्टंटबाजीमुळे सत्ताधारी भाजपचीच फजिती झाली, अशी खरमरीत टीका माजी आमदार आणि प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस मोहन जोशी यांनी केली आहे.

कोरोना नियंत्रणात महापालिका प्रशासनाला अपयश आले आहे, असे निवेदन खासदार बापट यांच्या नेतृत्वाखाली पालिका आयुक्त शेखर गायकवाड यांना देण्यात आले. यावर प्रतिक्रिया देताना मोहन जोशी म्हणाले, बापट आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केवळ स्टंटबाजी केली आहे. ही स्टंटबाजी करताना पालिकेत आपल्याच पक्षाची सत्ता आहे हे बहुधा बापट विसरले आणि त्यांच्या स्टंटबाजीच्या नादात भाजपचीच फजिती झाली. पालिकेने केलेल्या उपाययोजनांवर बापटांनी प्रश्न विचारला तेव्हा आयुक्तांच्या वतीने महापौर मुरलीधर मोहोळ यांनी उत्तर दिले तेव्हा तर बापटांच्या स्टंटबाजीचा पार फज्जा उडाला. महापौरांनीच बापटांच्या टीकेतील हवा काढून घेतली. सगळ्या शिष्टमंडळाचा खटाटोप भाजपच्याच अंगाशी आला.

साथ नियंत्रणासाठी गेले दोन महिने पुणेकरांची धडपड चालू असताना बापट गायब होते आणि एकदम अवतरले ते भाजपचीच फजिती करुन परत गायब झाले.

प्रतिबंधित क्षेत्रातील लोकांना धान्याचे कीट कधी मिळणार? रुग्णांसाठी पुरेसे बेड कधी तयार होणार? असे प्रश्न आयुक्तांना विचारण्याऐवजी बापटांनी महापालिकेतील सभागृहनेते, महापौर, स्थायी समिती अध्यक्ष यांना विचारायला हवे होते, असे जोशी यांनी पत्रकात म्हटले आहे. भाजपचे एक खासदार केंद्रात मंत्री आहेत, सहा आमदार आहेत, त्यांनी दोन महिन्यात काय केले याचा जबाब बापट कधी देणार? असा सवाल जोशी यांनी केला आहे.

पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी अधिकाऱ्यांच्या बैठका घेऊन कोरोना साथ नियंत्रणासाठी कसोशीने प्रयत्न चालू ठेवले आहेत. राज्य सरकार समर्थपणे परिस्थिती हाताळत आहे, ही वस्तुस्थिती जनतेला माहित आहे, मात्र राजकीय हेतुने बापट आणि भाजपचे नेते टीका करीत आहेत. पण त्यातून त्यांच्यासाठी काही साध्य होणार नाही, गिरीश बापट पाच वर्षे पुण्याचे पालकमंत्री होते. त्या काळात पाणीवाटप आदी निर्णयांबद्दल पुणेकर नाराज होतेच शिवाय त्यांच्या पक्षातच त्यांना पाठिंबा नव्हता. त्यांच्या कार्यक्षमतेचा ठसा कुठे उमटलाच नाही आणि आता त्यांनी पालकमंत्री दादांवर टीका सुरू केली आहे. दादांच्या कार्यक्षमतेविषयी विरोधकही शंका घेत नाहीत, पण पालिकेतील पक्षाचे अपयश, पक्ष यंत्रणेतील विस्कळीतपणा झाकण्यासाठी अजित पवारांवर टीका चालवती आहे, सूज्ञ पुणेकर त्यावर विश्वास ठेवणार नाहीत, असे जोशी यांनी म्हटले आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.