आंदोलन मोडीत काढण्यासाठी राजकीय दबाव : सय्यद

नगर – नगर – श्रीगोंदा तालुक्‍यातील 35 गावांना वरदान ठरणाऱ्या साकळाई उपसा सिंचन योजनेला मंजुरी मिळावी, यासाठी सुरु असलेला लढा मोडीत काढण्यासाठी काही राजकीय नेत्यांनी आता दबावतंत्राचा वापर सुरु केला आहे. आपल्या जनजागृती सभांमध्ये सहभागी होऊ नये म्हणून कार्यकर्त्यांवर राजकीय दबाव आणला जात असल्याचा आरोप अभिनेत्री दीपाली सय्यद यांनी केला आहे. पण अशा कुठल्याही दबावाला आपण घाबरणार नाही, साकळाई योजना मार्गी लागेपर्यंत हा लढा सुरूच ठेवणार असल्याचा निर्धारही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

“साकळाई’ योजनेसाठी क्रांतीदिनी (दि.9 ऑगस्ट) सुरु होणाऱ्या आमरण उपोषणाबाबत जनजागृती करण्यासाठी नगर व श्रीगोंदा तालुक्‍यातील 35 गावांमध्ये सुरु केलेल्या जनजागृती सभांच्या दुसऱ्या टप्प्यास सुरुवात करण्यात आली आहे.

रविवारी सुरेगाव येथे सभा झाली. त्यानंतर सोमवारी गुंडेगाव येथे झालेल्या सभेत सय्यद यांनी “साकळाई’ साठीचा लढा मोडीत काढण्यासाठी राजकीय दबाव टाकला जात असल्याचा आरोप केला. त्या म्हणाल्या, गेल्या काही दिवसांपासून सुरु केलेल्या जनजागृती सभांना विविध गावातील ग्रामस्थ, शेतकरी, महिला वर्गाचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. अनेकजण मोठ्या संख्येने या लढ्यात सहभागी होत आहेत. त्यामुळे या कार्यकर्त्यांवर व कृती समितीच्या सदस्यांवर सभांना जाऊ नये म्हणून राजकीय दबाव टाकला जात आहे.

राजकारणाची काही ठराविक मर्यादा असते पण हे लोक आता ती मर्यादा ओलांडण्याचा प्रयत्न करू लागले आहेत. त्यांच्या या दबावाचा माझ्यावर किंवा माझ्या दि.9 ऑगस्ट पासून सुरु होणाऱ्या आमरण उपोषणावर कुठलाही परिणाम होणार नाही. या 35 गावांतील शेतकऱ्यांच्या पुढच्या पिढीच्या भवितव्यासाठी हा लढा आपण सुरु केला असून तो साकळाई योजना मार्गी लागल्याशिवाय थांबणार नाही.

असा निर्धारही त्यांनी यावेळी व्यक्त केला. यावेळी गुंडेगाव ग्रामस्थांनी जोरदार घोषणा देत सय्यद यांच्या आंदोलनास पाठींबा दर्शविला. यावेळी बाळासाहेब नलगे, कृती समितीचे अध्यक्ष बाबा महाराज झेंडे, नारायण रोडे, पूनम शिंदे, उद्योजक विमल पटेल, कृषिराज टकले, सुभाष गागरे, संजय कोतकर, सुनिल भापकर, महादेव माने, पोपट तांबे, भाऊसाहेब शिंदे आदीसह ग्रामस्थ उपस्थित होते.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.