फीवाढीच्या विरोधात विद्यार्थ्यांचे धरणे

घोषणांनी पुणे विद्यापीठ उपकेंद्राचा परिसर दणाणला कुलगुरूंशी करणार चर्चा

नगर – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाला दिलेल्या इशाऱ्यानंतरही मास कम्युनिकेशन व बायोटेक यांची फी वाढ मागे न घेतल्याने न्यु आर्टस्‌, कॉमर्स ऍण्ड सायन्स महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या उपकेंद्रासमोर धरणे आंदोलन केले. विद्यार्थ्यांनी विद्यापीठाच्या गलथान कारभाराविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. फी वाढ केल्याने विद्यापीठ प्रशासनावर विद्यार्थ्यांनी तीव्र प्रतिक्रीया व्यक्त केल्या. तसेच यावेळी उपकेंद्र प्रमुख सोमवंशी यांनी कुलगुरूंच्या वतीने यावर विद्यार्थ्यांशी चर्चेची तयारी दर्शवली आहे.

यासाठी विद्यार्थ्यांच्या वतीने अविनाश साठे आणि भरत मोहळकर यांना चर्चेसाठी पाठवण्यात येणार आहे. यावर सकारात्मक तोडगा निघाला नाही तर विद्यार्थी आमरण उपोषण करणार आहेत. यावेळी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला दिशा विद्यार्थी संघटना, राष्ट्रवादी विद्यार्थी आघाडी, आखिल भारतीय विद्यार्थी परिषद, युवासेना, ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशन, स्वाभिमानी, संभाजी ब्रिगेड, भारताचा क्रांतीकारी कामगार पक्ष या सर्वांनी विद्यार्थ्यांच्या या आंदोलनाला पाठिंबा दिला.

यावेळी आंदोलनाचे समन्वयक रोहित भोंदे, अविनाश साठे, अपेक्षा साळवे, समाधान भोरे, भरत मोहळकर, क्रांती चिंचकर, शिवानी खेडेकर, अमृता जाधव यांनी परिश्रम घेतले. राष्ट्रवादी विद्यार्थीचे जिल्हाध्यक्ष गजानन भांडवलकर, दादा दरेकर, शहराध्यक्ष वैभव ढाकणे, भारताचा क्रांतीकारी कामगार पक्षाचे प्रविण सोनवणे, संदीप सकट, अभाविपचे रोहित राऊत, युवासेनेचे संदेश शिंदे, स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडचे आकाश कोथंबिरे उपस्थित होते. यावेळी न्यु आर्टस्‌ कॉलेजचे प्राचार्य बी.एच. झावरे यांनी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून पुर्वीच्या प्रवेश शुल्क पद्धतीनुसार प्रवेश देण्याचे आश्‍वासन दिले. यावेळी सिनेट सदस्य डॉ. बाळासाहेब सागडे यांनी या प्रश्‍नावर विद्यापीठाकडे पाठपुरावा करणार असल्याचे सांगितले.

उपकेंद्र प्रमुख सोमवंशी यांनी लवकरात लवकर या प्रश्‍नावर ठोस निर्णय घेण्यासाठी विद्यार्थी शिष्टमंडळाची कुलगुरूंशी चर्चा घडवून हा शुल्क वाढीचा प्रश्‍न सोडवण्याचे आश्‍वासन दिले. मात्र विद्यार्थी लेखी आश्‍वासनावर ठाम होते. डॉ. बाळासाहेब सागडे यांच्या मध्यस्थी व आश्‍वासनाने विद्यार्थ्यांनी कुलगुरूसोबत चर्चा होईपर्यंत आंदोलन स्थगित केले आहे. जर कुलगुरूंसोबत चर्चेतून हा प्रश्‍न सुटला नाही तर विद्यार्थी सामुदायिक उपोषण करणार असल्याचा इशारा दिला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)