चाचणी अहवाल येण्यापूर्वीच घरी सोडण्यासाठी आरोग्य यंत्रणेवर दबाव
पुणे – शहरात करोनाबाधितांची संख्या दिवसें-दिवस वाढत असताना, आता करोनाचे संशयित रुग्ण विलगीकरण कक्षात न ठेवता त्यांना घरी सोडण्यासाठी राजकीय दबाव आणला जात असल्याचे प्रकार समोर येत आहेत. त्यामुळे चाचणी अहवाल येण्यापूर्वीच हे संशयित घरी येत असून त्यांच्यामुळे इतरांना करोनाची बाधा झाल्याचे प्रकार समोर आले आहेत. परिणामी, शहरात करोनाला आळा घालण्यासाठी प्रशासनाकडून राबविण्यात येत असलेल्या उपाय योजनांवर पाणी फेरले जात असल्याचे चित्र आहे.
शहरात करोनाची साथ वेगाने पसरण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे महापालिकेकडून करोना बाधितांच्या संपर्कात आलेल्या अथवा लक्षणे दिसल्यानंतर स्वत: पालिकेच्या कोविड केअर सेंटर तसेच फ्लू सेंटरमध्ये तपासणीस आलेल्या नागरिकांचे नमुने आरोग्य विभागाकडून घेतले जातात. त्यानंतर अहवाल येईपर्यंत या नागरिकांना पालिकेने शहरात वेगवेगळ्या ठिकाणी सुरू केलेल्या विलगीकरण कक्षात ठेवले जाते. तर, अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर या रुग्णांना कोविड रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले जाते. तर ज्यांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. त्यांना हातावर विलगीकरणाचे शिक्के मारून दहा दिवस घराबाहेर पडण्यास मनाई केली जाते तसेच त्यांच्याकडून हमीपत्र घेतले जाते.
मात्र, गेल्या काही दिवसात पालिकेने करोना तपासणीचे नमुने घेतल्यानंतर काही रुग्ण आपल्या घरी विलगीकरणाची सुविधा आहे. असे सांगत, स्थानिक लोकप्रतिनिधींकडून दबाव आणतात, त्यानंतर विलगीकरण कक्षाकडे अहवाल येईपर्यंत बाहेर जाणार नाही, असे हमी पत्र देऊन घरी निघून येतात. मात्र, दोन दिवसांनी अशा व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर हे रुग्ण घरी सापडत नसल्याची काही प्रकरणे समोर आली आहेत. तर हे बाधित घरी विलगीकरणात न राहता या दोन दिवसात अनेकांना भेटल्याचे आरोग्य विभागाच्या सर्वेक्षणात समोर आले आहे. त्यामुळे हा राजकीय हस्तक्षेप प्रशासनासाठी डोकेदुखी बनला आहे.
बोपोडी येथील एका संशयित रुग्णांचे करोनाचे नमुने तीन दिवसांपूर्वी घेतल्यनंतर, या रुग्णास विलगीकरणात ठेवण्यात आले. मात्र, दोन दिवस या ठिकाणी रहावे लागणार असल्याने हा रुग्ण राजकीय दबाव आणून घरी गेला. त्यानंतर पुढील दोन दिवस हा संशयित रुग्ण त्याच्या परिसरात बिनदिक्कत फिरत होता. त्याचा अहवाल गुरुवारी पॉझिटिव्ह आल्यानंतर संबंधित रुग्ण मागील दोन दिवस 25 ते 30 जणांना जवळून भेटला असल्याचे आरोग्य विभागाच्या तपासणीत समोर आले. तर गुरुवारी सकाळी हा रुग्ण घरी नव्हता. त्यामुळे आरोग्य विभागाची त्याला शोधण्यासाठी चांगलीच धावपळ सुरू होती.
काही दिवसांपूर्वी सणस मैदानातील विलगीकरण केंद्रातही असाच प्रकार घडला. घरातील एका व्यक्तीला करोनाची लक्षणे दिसल्याने हे संपूर्ण कुटूंब सणस मैदान येथे तपासणीसाठी गेले. त्यानंतर त्यांना तिथेच विलगीकरणात ठेवण्यात आले. मात्र, राजकीय दबाव आणून संपूर्ण सहा जणांचे कुटूंब घरी गेले. त्यानंतर दोन दिवसांनी कुटुंबातील पाच पैकी चार जणांचा अहवाल निगेटीव्ह आला तर एका सदस्याचा अहवालच आला नाही. त्यामुळे तीन दिवसांनी या कुटुंबातील एक सदस्य उर्वरीत अहवालाबाबत विचारणा करण्यासाठी गेल्यावर अहवाल चुकले असून पहिल्या चारमध्ये एक जण बाधित आहे. त्यांना आधी घेऊन या, असे या कुटुंबाला सांगण्यात आले. मात्र, तोपर्यंत बाधित सदस्य सर्वांसोबत अहवाल निगेटिव्ह असल्या प्रमाणे वावरत होता.