राजगुरूनगर – खेड पंचायत समितीचचे सभापती राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अरुण चौधरी यांनी आज त्यांच्या सभापती पदाचा राजीनामा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांच्याकडे सोमवारी (दि. 21) दिला आहे. यामुळे शांत झालेल्या पंचायत समितीचे महानाट्य पुन्हा रंगणार असे चित्र निर्माण झाले आहे.
पंचायत समितीचा कार्यकाल मार्च महिन्यात संपुष्टात येणार आहे. सभापतीपद ओबीसी साठी राखीव आहे. ओबीसी आरक्षण नुकतेच रद्द झाले आहे. पुढेही काही दिवसात पंचवार्षिक निवडणूक कार्यक्रम लागणार आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाचे नियम आणि सभापती पदाची पुढील निवडणूक होणार का? नाही याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
खेड पंचायत समितीमधील शिवसेनेच्या सत्तेला राष्ट्रवादी कॉंग्रेसने शिवसनेच्या सदस्यांना बरोबर घेऊन सत्ता सुरुंग लावला होता. सभापती पदासाठी तब्बल 101 दिवस राष्ट्रवादी, शिवसेना व भाजप सदस्य राजकीय सहलीवर होते. याच दरम्यान सहलीवर असलेल्या ठिकाणी तत्कालीन सभापती भगवान पोखरकर यांच्यात हाणामारी होवून गुन्हे दाखल झाले होते. राज्यात या घटनेची मोठी चर्चा झाली होती. गाजलेल्या खेड पंचायत समितीच्या सभापती पदाची निवडणूक अत्यंत चुरस आणि तणावपूर्ण वातावरणात झाली होती. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या बाजूने पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार, शिवसेनेच्या खासदार संजय राऊत, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील खेड तालुक्यावर लक्ष केंद्रित केले होते. त्यानंतर खेड पंचायत समितीच्या सभापतिपदी राष्ट्रवादीचे अरुण चौधरी यांची बिनविरोध निवड झाली होती.
राजीनामा पत्र वाचून द्या
सभापती अरुण चौधरी यांनी सभापतिपदाचा राजीनामा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांच्याकडे सुपूर्द केला यावेळी आयुष प्रसाद यांनी राजीनामा पत्र वाचून द्या, ते वाचतानाचा व्हिडिओ करण्यात आला आहे. तोही सोशल मीडियावर झळकला आहे. सभापती चौधरी यांनी स्वखुशीने राजीनामा देत असल्याचे आपल्या राजीनाम्यात म्हटले आहे.
आता “या’कडे लक्ष
सभापती चौधरी यांचा राजीनामा जिल्हा परिषदेच्या अध्यक्षाकडे मंजुरीसाठी जाणार असून मंजुरी नंतर जिल्हाधिकारी यांच्याकडे पुढील कार्यवाहीसाठी पाठविण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी निवडणूक घेतील का? की तोपर्यंत निवडणूक आयोग पंचवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करणार का याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
सुनीता सांडभोर यांना संधी?
सभापतीपदासाठी आता सुनीता सांडभोर या दावेदार असून त्यांना संधी मिळणार का? सभापती निवडणूक नाट्यात सांडभोर यांची खूप मोठी भूमिका होती. मात्र त्यांना आतापर्यंत या पदासाठी प्रतीक्षा करावी लागली होती. आता ही संधी आली आहे, त्यामुळे अगोदर सभापती की पंचवार्षिक निवडणूक होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.