नवी दिल्ली – बायोलॉजिकल ई लिमिटेड कंपनीच्या कोर्बेव्हॅक्स या लसीला 12 ते 18 वर्षाच्या वयोगटासाठी आपत्कालीन वापराला मान्यता दिली. 12 ते 15 वर्षाच्या वयोगटासाठी वापरण्यास मान्यता मिळालेली ही पहिलीच लस असून 15 ते 18 वयोगटासाठी वापरास मान्यता मिळालेली ही दुसरी लस आहे.
भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिन लसीच्या वापरला भारतात 15 ते 18 वर्ष वयोगटासाठी तीन जानेवारीपासून सुरवात केली आहे. या लसीच्या प्रौढांमध्ये आपत्कालीन वापरास डिसेंबर 2019मध्ये मान्यता देण्यात आली आहे.
“बायोलॉजिकल ई’ला या लसीच्या 12 ते 18 वयोगटासाठी आपत्कालीन वापरास मान्यता त्याच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील चाचण्यांच्या निष्कर्षावर आधारित परवानगी मिळाली असल्याचे कंपनीच्या निवेदनात म्हटले आहे.
ही लस स्नायूंमध्ये देण्यात येते. 28 दिवसांच्या अंतराने दुसरा डोस घ्यायचा आहे. 12 ते 15 वर्षाखालील वयोगटात लसीकरण बाबत केंद्र सरकारने अद्याप निर्णय घेतला नाही. ही लस 0.5 मीली, दहा मात्रांच्या पाच मिली आणि 20 मात्रांच्या 10 मिलीच्या कुपीत उपलब्ध आहे. ती दोन ते आठ अंश तापमनात साठवता येते.
“बायोलॉजिकल ई’च्या व्यवस्थापकीय संचालक महिमा दातला म्हणाल्या, आपल्या देशात 12 ते 18 वयोगटासाठी या लसीच्या वापराला मान्यता मिळणे, ही अत्यंत महत्वाची घटना आहे. यामुळे या जागतिक साथीच्या अंताजवळ आपण पोहोचलो आहोत. एकदा पूर्ण लसीकरण झाल्यानंतर मुले नेहमीप्रमाणे वारू शकतील. शाळा आणि महाविद्यालयात कोणत्याही काळजीविना जाऊ शकतील.
हैदराबादमधील या कंपनीच्या कोर्बेव्हॅक्स लसीच्या मुले आणि किशोरवयीन अशा पाच ते 18 वयोगटावर मानवी चाचण्या घेण्यास सप्टेंबर 2021मध्ये मान्यता दिली होती. त्यातील सुरक्षितता आणि परिणामकारकता पाहून त्याच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील चाचण्यांना मान्यता देण्यात आली.