सातारा (प्रतिनिधी)- राजकीय नाट्य, चर्चा, बैठका यशस्वी शिष्टाई, अनेक नाट्यमय घडामोडीनंतर भारतीय जनता पक्षाच्या केंद्रीय निवड समितीकडून खासदार उदयनराजे भोसले यांच्या सातारा लोकसभेच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.
या पार्श्वभूमीवर उदयनराजे बुधवारी जिल्ह्यात परतले तेव्हा हद्दीवर त्यांच्या समर्थकांच्यावतीने जोरदार जल्लोषी स्वागत करण्यात आले. ‘उदयनराजे आगे बढो हम तुम्हारे साथ है‘ या घोषणांनी शिरवळ पुलाचा परिसर दणाणला. एक भव्य हार घालून उदयनराजे भोसले यांचा राजे समर्थकांच्यावतीने सत्कार करण्यात आला.
खासदार उदयनराजे भोसले यांना भाजपची उमेदवारी मिळणार की नाही या प्रश्नाचा सस्पेन्स गेल्या पंधरा दिवसापासून कायम होता. याबाबतचा अधिकृत निर्णय उद्या जाहीर होण्याची शक्यता आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशी चर्चेच्या वेळी उदयनराजे यांच्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिष्टाई केली होती.
उदयनराजे निवडक समर्थकांसह जिल्ह्याच्या हद्दीवर सायंकाळी पाच वाजता आले असता महामार्गावर त्यांचे मोठे स्वागत करण्यात आले. लोकसभा संयोजक सुनील काटकर, काका धुमाळ, विक्रमबाबा पाटणकर, विनित पाटील, चंद्रकांत पाटील, संदीप शिंदे आदी कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. समर्थकांनी जेसीबीद्वारे त्यांचा भव्य हार घालून विशेष सत्कार केला. ‘येऊन येऊन येणार कोण आणि उदयनराजेंशिवाय आहेच कोण, आले रे आले रे उदयनराजे, अशा घोषणांनी परिसर दणाणला.
कमळ चिन्हाने सजविलेल्या रथात उदयनराजे हात उंचावून अभिवादन लोकांना अभइवादन करत होते. महामार्गावरील शिरवळ, केसुर्डी, खंडाळा, वेळे, जोशी विहीर, बदेवाडी, भुईंज, पाचवड फाटा, आनेवाडी अशा ठिकठिकाणी उदयनराजे यांच्या स्वागताला जिल्ह्यातील कार्यकर्ते उपस्थित होते. प्रत्येक ठिकाणी उदयनराजे यांना हार देऊन अभिनंदन करत होते. यावेळी कार्यकर्त्यांच्या चेहर्यावर जोश पाहायला मिळत होता.
मी आजही अन उद्याही जनतेचाच
जिल्ह्यातील तमाम नागरिकांचे प्रेम पाहून मी भारावलो आहे. मी जनहितासाठी अखंड सक्रिय राहणार असून मी आजही जनतेचा व उद्याही जनतेचा राहणार असल्याची भावनिक प्रतिक्रिया खा. उदयनराजे यांनी दिली. मी दिल्लीत ताटकळलो अशा बातम्या नाकारत भाजपच्या तीन टप्प्याचे उमेदवार जाहीर होत असल्याने केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशी उशिरा भेट झाली, असे उदयनराजे यांनी सांगितले.
ते म्हणाले, लोकसभा लढवायचीच हे मी ठरवलेच होते. पण प्रत्येक गोष्टीला एक वेळ असते, पक्षश्रेष्ठींशी काय बोलायचे ते बोललो. राज्यात महायुतीच्या घटक पक्षांच्या वरिष्ठांशी बोलणे झाले आहे, असे त्यांनी सांगितले. उमेदवारीची गुड न्यूज कधी देणार ?असे विचारले असता आता जाहीर करायला काय बाकी आहे, काम सुरूच झाले समजा, असे उत्तर उदयनराजे यांनी दिले.
साताऱयात अखंड पुष्पवृष्टी
सातारा शहराच्या हद्दीवर बॉम्बे रेस्टॉरंट चौकात सायंकाळी सात वाजता उदयनराजे आणि त्यांच्या समर्थकांचा ताफा पोहोचला. तेथून सातार्यात प्रवेश झाल्यानंतर शिवतीर्थावर उदयनराजे भोसले यांनी छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करू अभिवादन केले. तेव्हा कार्यकर्त्यांनी एकच वाघ उदयनराजे उदयनराजे अशा जोरदार घोषणा देत उदयनराजे यांच्यावर अखंड पुष्पवृष्टी केली.
त्यानंतर शाहू चौकामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर व अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर राजे समर्थकांची रॅली शाहू चौक, तालीम संघ मैदान, कमानी हौद देवी, चौक मोती, राजवाडा अशी जात असताना उदयनराजे यांच्या स्वागतासाठी कार्यकर्त्यांची गर्दी वाढतच गेली. गोल बाग परिसरात प्रतापसिंह महाराज (थोरले) यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. राजवाडा ते जलमंदिर दरम्यान कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. जलमंदिरात रॅली गेली. तेथे राजमाता कल्पनाराजे भोसले यांनी उदयनराजे यांचे औक्षण करून स्वागत केले.