मुंबई – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी पाडवा मेळाव्यात मशिदीवरील भोंग्यांवरून घेतलेल्या भूमिकेनंतर मनसेतील मतभेद चव्हाट्यावर आले होते. राज ठाकरे यांच्या भूमिकेपेक्षा काहीशी वेगळी भूमिका घेणारे पुणे शहराध्यक्ष वसंत मोरे चर्चेत आले होते. त्यातच आज त्यांना शहराध्यक्ष पदावरून हटविण्यात आलं. यावर पुर्वाश्रमीच्या मनसेच्या फायरब्रांड नेत्या रुपाली पाटील ठोंबरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
रुपाली पाटील ठोंबरे म्हणाल्या की, वसंत मोरे चांगले काम करतात. परंतु आज ज्या पद्धतीने पक्षामध्ये खांदेपालट झाले ते दुर्दैवी आहे. वसंत मोरे यांनी प्रभाग शांत ठेवण्याची भूमिका घेतली, परंतु राजकीय डाव खेळून त्यांच्याविरोधात खेळी खेळली गेली, असे त्या म्हणाल्या.
रुपाली पाटील म्हणाल्या की, वसंत मोरे लोकप्रतिनिधी होते. आपणही पक्षांतर्गत धुसफुसीला कंटाळून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला जय महाराष्ट्र केला. मी पक्ष सोडला तेव्हा बंधू वसंत मोरेंनी ताईंनी राजकीय आत्महत्या केल्याचे म्हटले होते. परंतु आज वसंत मोरे यांची राजकीय हत्या झालीय की आत्महत्या केलीय हे उभा महाराष्ट्र बघतोय. ही दुर्दैवी गोष्ट असल्याचं पाटील यांनी नमूद केलं.