मालकिणीवरील बिबट्याचा हल्ला कुत्र्याने झेलला

साकोरी फाटा येथील घटना

बेल्हे – कुत्रा (श्‍वान) हा माणसाचा सर्वात जवळचा आणि विश्‍वासू प्राणी मानला जातो. याच पाळीव कुत्र्यांमुळे साकोरी फाटा (ता. जुन्नर) मधील महिला शेतकऱ्याचा जीव वाचला आहे. पहाटेच्या सुमारास उसाच्या पाणी देऊन परतणाऱ्या महिलेवर दबा धरून बसलेल्या बिबट्याने हल्ला केला; मात्र सुदैवाने कुत्रामध्ये आल्याने महिला शेतकऱ्याचे प्राण वाचले असले तरी कुत्रा गंभीर जखमी झाल आहे. दरम्यान, या घटनेमुळे शेतात रात्री पाणी देण्यासाठी शेतकऱ्यांच्या मनात भीती बसली असून शेतात पाणी देण्यासाठी दिवसा वीजपुरवठा सुरू ठेवावा, अशी मागणी जोर धरीत आहे.

सविस्तर माहिती अशी की, लता अशोक डावखर व अशोक रामभाऊ डावखर हे पती- पत्नी या घरापासून 200 ते 300 मीटर अंतरावर असणाऱ्या उसाच्या शेतात शनिवारी (दि.7) रात्री पाणी देत होते. पहाटे साडेतीन वाजता पती अशोक यांनी आपल्या पत्नीला घरी झोपण्यासाठी जाण्यास सांगितले.घरी जात असताना त्यांच्यासोबत कुत्रा होता. त्यावेळी झाडीत दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक त्यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात त्यांच्या जवळ असणारा कुत्रामध्ये आला व त्याने बिबट्याचा हल्ला स्वत:वर घेतला. यावेळी लता डावखर यांनी आरडाओरडा केल्याने त्यांचे पती व इतर शेतकरी धावत आल्याने बिबट्याने धुम ठोकली; मात्र बिबट्याच्या हल्ल्यात कुत्रा गंभीर जखमी झाला आहे.

दरम्यान, या हल्ल्यामुळे लता डावखर खूप भयभीत झाल्या असून त्यांच्यावर बेल्हे येथे प्राथमिक उपचार केला असून त्यांची प्रकृती ठिक असल्याची माहिती अशोक डावखर यांनी दिली. तर या घटनेची माहिती बेल्हे गावचे सामाजिक कार्यकर्ते दत्ता खोमणे यांनी वनविभागाला कळवली. माहिती मिळाल्यानंतर पहाटे बेल्हे वनरक्षक दत्ता फापाळे यांनी लता डावखर यांच्यावर झालेल्या हल्लाची माहिती घेतली.

Leave A Reply

Your email address will not be published.