नेवासा – नेवाशात वादग्रस्त संवादाची ऑडिओ क्लिप पुन्हा एकदा सोशल मीडियावर प्रसारित झाल्यामुळे पोलिसांच्या हप्तेखोरीचा विषय समोर आलेला आहे. या ऍडिओ बॉम्बने नेवाशात खळबळ उडवून दिली. दुसरीकडे वाळूचा डंपर पकडला असता पोलिस कर्मचाऱ्यास धक्काबुक्की करून शर्ट फाडण्यात आला. तर नेवासा तहसिलदारांच्या निवासस्थानासमोर कारवाई केलेला वाळूने भरलेला डंपर पळवून नेण्याचा प्रकार घडला. वादग्रस्त ऑडिओ क्लिप, पोलीस कर्मचाऱ्यास धक्काबुक्की याप्रकरणी जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला काय कारवाई करणार, याकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे.
“पालकमंत्री विखे यांच्या आदेशाला ठेंगा’, नेवाशात अवैध वाळू वाहतूक सुरू ! महसूल व पोलीसांचा छुपा आशिर्वाद’ अशा मथळ्याखाली वृत्त दैनिक प्रभातमध्ये दि.10 एप्रिल रोजी प्रसिद्ध झाले होते. पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी या वृत्ताची गंभीर दखल घेत नेवासा, शेवगाव, कोपरगाव आणि पारनेर पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांना चांगलीच तंबी देत वाळू उपसा बंद करण्याचे आदेश दिले होते. यापूर्वी वादग्रस्त ठरलेल्या आणि सध्या नेवासा पोलीस ठाण्यात नेमणूक असलेल्या एका पोलीस शिपायाची ऑडिओ क्लिप प्रसारित झाली आहे.
मोबाईलवरून बोलताना या शिपायाला एकजण “त्याची वाळू का बंद केली रे…’ अशी विचारणा करताच वादग्रस्त पोलीस शिपाई याने पत्रकार राजेंद्र वाघमारे यांनी बातमी लावल्यामुळे एकाचीच नाहीतर सर्वांचीच वाळू बंद केली असल्याचे सांगितले. केवळ नेवाशाचीच नाहीतर सगळीकडेच वाळू बंद ठेवण्याचे साहेबांनी सांगितलेले आहे. शिवाय या महिन्यात “त्या’ वाळूतस्तराने 10 हजार रुपयेही कमी दिलेले असून महिनाही संपला असल्याचा सांगितले. ही ऑडिओ क्लिप प्रसारित झाल्यामुळे पोलिसांच्या लाचखोरीचा कारभार पुन्हा एकदा उजेडात आलेला आहे.
या प्रकारानंतरही पुन्हा नेवाशात वाळूतस्करांचा कहर काही थांबलेला दिसत नाही. नेवासा तहसिलदारांच्या निवासस्थानासमोर कारवाई केलेला वाळूने भरलेला डंपर पळवून नेण्याचा प्रकार घडला. याप्रकरणी तलाठ्याने नेवासा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. दुसरी फिर्याद नेवासा पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक राहुल यादव यांनी दिली. यादव व हवालदार गायकवाड यांनी वाळूचे वाहन रोखले असता वाळूतस्करांनी शर्ट फाडून धक्काबुक्की करत डंपर पळवून नेण्याची घटना समोर आलेली आहे.
याप्रकरणी कैलास पवार व चालक भाऊसाहेब बबन पोकळे यांच्याविरोधात सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील चालक पोकळे यास ताब्यात घेण्यात आले. या प्रकारावरून नेवासा पोलिसांच्या खाकीचा दरारा पुन्हा एकदा संपुष्टात आलेला आहे. त्यातच तहसीलदारांच्या निवासस्थानावरून पळविलेला डंपर आणि पोलिसांना झालेल्या धक्काबुक्कीच्या फिर्यादीवरून महसूल आणि पोलिसांचा कारभार चव्हाट्यावर आलेला आहे.