श्रीरामपूर -भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीत आज जयंतीदिनी अभिवादन करण्याचा योग आला हे माझे भाग्यच आहे. यापुढे देखील हरेगाव येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकासाठी सर्वेतोपरी सहकार्य करणार असल्याचे प्रतिपादन आमदार बाळासाहेब थोरात यांनी केले. आमदार लहु कानडे यांच्या प्रयत्नातून सुमारे 95 लाख रुपयांच्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक सभागृहाचे लोकार्पण आमदार थोरात यांच्या हस्ते तर जिल्हा बॅंकेचे संचालक करण ससाणे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले.
थोरात म्हणाले की, हरेगाव येथील स्मारकाला विशेष महत्त्व आहे. याठिकाणी स्वतः डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा स्पर्श झाला आहे. आज त्याठिकाणी अभिवादन करण्याचा योग आमदार कानडे यांच्यामुळे मिळाला. सभागृहाचा उपयोग विद्यार्थ्यांसाठी वाचनालय, ग्रंथालय म्हणून व्हावा. माजी नगरसेवक अशोक कानडे म्हणाले की, डॉ. आंबेडकरांचे भव्य असे सामाजिक सभागृह उभारले आहे. याचा आनंद आम्हा सगळ्या कार्यकर्त्यांना आहे. अध्यक्षस्थानावरून करण ससाणे म्हणाले की, हरेगाव येथे डॉ. आंबेडकर स्मारक उभे रहावे, असे स्वप्न स्व.ससाणे यांचे होते. ते स्वप्न आज आमदार कानडे यांच्या रुपाने साकार झाले आहे.
माजी सभापती डॉ. वंदना मुरकुटे यांनी डॉ.आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त शुभेच्छा दिल्या. साईबाबा संस्थानचे माजी विश्वस्त सचिन गुजर, तालुकाध्यक्ष अरुण पाटील नाईक, माजी सभापती बाबासाहेब दिघे, सरचिटणीस ज्ञानेश्वर मुरकुटे, सुधीर नवले, सरपंच उषाताई कांबळे, कार्लस साठे, अशोक बागुल, राजेंद्र पाऊलबुद्धे, सतिष बोर्डे, दिलीप गलांडे, संतोष मोकळ, हेमंत ओगले आदी व्यासपीठावर उपस्थित होते.