राहुरी – राहुरीतील मुलींच्या शाळेजवळ टवाळकी करणाऱ्या रोडरोमिओंची पोलीस पथकाने काल धरपकड करत धुलाई करून ताब्यात घेतले. यामुळे टवाळखोर तरुणांमध्ये चांगलीच धावपळ उडाली होती.
गेल्या काही दिवसांपासून राहुरी शहरातील विद्यामंदिर शाळा, भागीरथीबाई शाळा तसेच राहुरी कॉलेज आदी ठिकाणी टवाळखोर रोड रोमिओ शाळा भरतेवेळी व सुटतेवेळी शाळा परिसरात गर्दी करून टवाळकी करीत होते. यामुळे शालेय व महाविद्यालयीन मुलींना शाळेत येताना व जाताना या त्रास सहन करावा लागत होता. त्यामुळे पालक वर्गातून चिंता व्यक्त करण्यात येत होती.
पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली राहुरी येथील पोलिस नाईक सचिन ताजणे, नदिम शेख, भाऊसाहेब शिरसाट, प्रमोद ढाकणे, प्रवीण आहिरे आदी पथकाने राहुरी कॉलेज व भागीरथीबाई शाळा परिसरात साध्या वेशात जाऊन टवाळकी करणाऱ्या रोड रोमिओंची धरपकड करत आठ ते दहा तरुणांना ताब्यात घेतले.त्यांना पोलीस ठाण्यात आणून त्यांची यथेच्छ धुलाई करत प्रतिबंधात्मक कारवाई केली.