मुंबई – बीडीडी चाळ पूनर्वसन प्रकल्पात पोलिसांना 15 लाखांत घर देण्याच्या घोषणेनंतर शिंदे-फडणवीस सरकारने पोलिसांसाठी आणखी एक निर्णय घेतला आहे. कॉन्स्टेबल रॅंकपर्यंतच्या पोलिसांना आता खात्यांतर्गतच 20 लाखांपर्यंतचे कर्ज मिळणार आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. ठाकरे सरकारने ही योजना बंद केली ही योजना पुन्हा सुरू केल्याने पोलिसांना मोठा दिलासा मिळणार आहे.
महाराष्ट्र पोलीस दलातील एक महत्त्वाची योजना म्हणजे डीजी योजना. या योजनेतून कॉन्स्टेबलपर्यंतच्या कर्मचाऱ्यांना खात्यामार्फतच 20 लाखापर्यंतचं कर्ज मिळते. संजय पांडे जेव्हा महाराष्ट्राचे अतिरिक्त पोलीस महासंचालकपदी होते, तेव्हा ठाकरे सरकारने पोलिसांसाठी डीजी योजना बंद केली होती. परंतु, देवेंद्र फडणवीसांनी ही योजना पुन्हा सुरू केली आहे.
दरम्यान, मुंबईतील बीडीडी चाळीतील पोलिसांना 15 लाखांत घरं देणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. काही दिवसांपूर्वी केली होती. मागील अनेक वर्षांपासून पोलिसांच्या निवासस्थानाचा प्रश्न प्रलंबित आहे. बीडीडी चाळीत राहणाऱ्या पोलिसांच्या घरांची अवस्था फार बिकट आहे.
याच पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे यांनी बीडीडी चाळीत राहणाऱ्या पोलिसांना किफायतशीर दरात घरे देण्याचे जाहीर केले. त्यानंतर, त्यांना सोयीस्कररित्या कर्ज प्रक्रियाही सुलभ करून देण्यात आल्याने पोलिसांना याचा नक्कीच फायदा होणार आहे.