मुंबई – 1993च्या मुंबई साखळी बॉम्बस्फोट प्रकरणातील प्रमुख आरोपी आणि फरारी अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमला अटक करण्यासाठी एनआयएनने मोठे पाउल उचलले आहे. राष्ट्रीय तपास संस्थेने डी कंपनीवर मोठी कारवाई करत अंडरवर्ल्ड डॉनवर 25 लाखांचे बक्षीस जाहीर केले आहे. तसेच दाऊदचा उजवा हात असलेल्या कुख्यात गुंड छोटा शकीलवर 20 लाखांचे बक्षीस ठेवण्यात आले आहे. या गॅंगमधील अन्य तीन सदस्य टायगर मेमन, अनीस इब्राहिम आणि जावेद चिकना यांच्यावर प्रत्येकी 15 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे.
दाऊद इब्राहिम हा भारतात शस्त्रे, स्फोटके, ड्रग्ज आणि बनावट भारतीय नोटांची तस्करी करण्यासाठी एक विशेष युनिट तयार करत असल्याची माहिती गुप्तचर यंत्रणांना मिळाली होती. तसेच पाकिस्तानी गुप्तचर संस्था आयएसआय आणि काही दहशतवादी संघटनाही त्याला यात मदत करत असल्याची माहितीदेखील समोर आली होती. यामुळे एनआयए सतर्क झाली असून भारताने मोस्ट वॉन्टेड गुन्हेगारांवर बक्षीस जाहीर केले आहे. या वर्षाच्या सुरुवातीला एनआयएने 29 ठिकाणी छापे टाकले होते. यात सर्वाधिक छापे मुंबईत टाकण्यात आले.
भारतातील अनेक दहशतवादी कारवाया करत वॉंटेड असलेल्या दाऊदला 2003मध्ये संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेने जागतिक दहशतवादी म्हणून जाहीर केले आहे. अनीस इब्राहिम शेख, छोटा शकील, जावेद चिकना आणि टायगर मेमन यांसारखे त्याचे जवळचे सहकारी डी-कंपनी नावाचे आंतरराष्ट्रीय दहशतवादी नेटवर्क चालवतात.
दाऊदच्या विशेष युनिटचा उद्देश पाक गुप्तचर संस्था आयएसआय आणि इतर दहशतवादी संघटनांच्या सहकार्याने भारतात दहशतवादी कारवाया करणे हा आहे. तसेच डी कंपनी काही राजकीय नेते आणि व्यावसायिकांना देखील लक्ष्य करण्यासाठी याचा वापर करू शकते.
दाऊदची ही टीम भारतात सध्या अस्तित्वात असलेल्या लष्कर, जेएम आणि अल-कायदासारख्या दहशतवादी संघटनांच्या दहशतवाद्यांना आणि स्लीपर सेललाही मदत करणार असल्याची माहिती समोर आली आहे.
दरम्यान, दाऊदला पाकिस्तानने आश्रय दिल्याचे सांगितले जाते. दाऊदचा लष्कर-ए-तैयबा (एलईटी) प्रमुख हाफिज सईद, जैश-ए-मोहम्मद (जेएम) प्रमुख मौलाना मसूद अझहर, हिजबुल मुजाहिदीनचा संस्थापक सय्यद सलाहुद्दीन आणि त्याचा जवळचा सहकारी अब्दुल रऊफ असगर यांच्याशी जवळचा संबंध आहे.