शिरूर पोलीस, गुन्हे अन्वेषण विभागाकडून दोन आरोपी गजाआड : दोघेही रेकार्डवरील गुन्हेगार
शिरूर/ सविंदणे/ लोणी काळभोर, – कवठे येमाई येथे (दि. 26) नूरमहंमद बबन पठाण (वय 60) यांच्या घरात 5 चोरट्यांनी शिरून फिर्यादी व पत्नीस मारहाण केल्याप्रकरणी शिरूर पोलिसांनी चार दिवसांत गुन्ह्याचा छडा लाऊन एकाला जेरबंद केले. प्रवीण नरेश काळे (वय 21, रा. सुलाखेवाडी, निघोज, ता. पारनेर, जि. अहमदनगर), असे शिरूर पोलिसांनी अटक केलेल्याचे नाव आहे. दरम्यान, पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने याच प्रकरणातील दुसरा आरोपी अविनाश ऊर्फ आवड्या सादीश काळे (वय 24, रा. वाळुंज पारगाव, जि. नगर) याला अटक केली आहेत.
पठाण यांच्या घरात चोरट्यांनी कपाटातील दागिने व रोख रक्कम फिर्यादींच्या पत्नीचे दागिने चोरून नेले होते. साक्षीदार प्रकाश गणाजी इचके यांच्या घरी सुद्धा त्याच रात्री चोरी झाली होती. त्यांच्या घरातील दागिने व रोख रक्कम, भरत देवराम भोर यांच्या डेअरीत चोरीचा प्रयत्न केला होता. शशिकांत दगडू पळसकर यांच्या घरातील कपडे चोरी करून 73 हजार तीनशे रुपयाचे दागिने व रोख रक्कम घेऊन चोरटे पसार झाले होते. याप्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप पाटील, बारामतीच्या अप्पर पोलीस अधीक्षक जयंत मीना, दौंडच्या उपविभागीय अधिकारी ऐश्वर्या शर्मा, पोलीस निरीक्षक प्रवीण खानापुरे, शिरूर पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांना माहिती दिली.
त्यांच्या मार्गदर्शनाखाली तपासाला सुरुवात करून पोलीस निरीक्षक प्रवीण खानापुरे, पोलीस नाईक संजीव जाधव, पोलीस कॉन्स्टेबल संजय साळवे, विजय जंगम यांनी गुन्ह्यातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे फरारी आरोपींचा शोध घेतला. प्रवीण नरेश काळे याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे कसून चौकशी केली असता त्याने गुन्हा केल्याची कबुली दिली. गुन्ह्यातील आरोपी निष्पन्न करून त्यांना अटक केली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक भगवान पालवे हे करीत आहेत.
दरम्यान, या प्रकरणातील दुसरा आरोपी अविनाश ऊर्फ आवडया सादीश काळे याला गुन्हे अन्वेषण विभागाने अटक केली आहे. त्याला गजाआड करण्यासाठी सहायक पोलीस निरीक्षक दत्तात्रय गुंड, सहायक पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय गिरमकर, हवालदार उमाकांत कुंजीर, राजू मोमीन, जनार्दन शेळके, जनार्धन शेळके, अक्षय जावळे, धीरज जाधव, महेश आव्हाड, शिवाजी कावडे यांच्या पथकाने कारवाई केली आहे.
अविनाश ऊर्फ आवड्यावर गंभीर गुन्हे दाखल –
स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांच्या मार्गदर्शनाखाली दुसरा आरोपी जेरबंद झाला आहे. या प्रकरणात कोणताही पुरावा नसताना गुन्हे अन्वेषण पथकाने धाडसी दरोडा उघडकीस आणला आहे. आरोपी अविनाश ऊर्फ आवड्या सादीश काळे हा गंभीर गुन्ह्यामध्ये फरारी होता. तो पारनेर व नगर तालुका पोलीस ठाण्यातील गुन्ह्यामध्ये फरारी आहे. त्याच्यावर यापूर्वी श्रीगोंदा, पारनेर पोलीस ठाण्यात गंभीर गुन्हे दाखल आहेत.